कंकालेश्वर कुंडात युवक बुडाला
By Admin | Published: June 4, 2017 12:26 AM2017-06-04T00:26:41+5:302017-06-04T00:30:07+5:30
बीड : येथील कंकालेश्वर जवळील कुंडात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील कंकालेश्वर जवळील कुंडात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. सायंकाळी उशिरा त्याचा शोध लागला. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्यामुळेच युवकाचा मृतदेह सापडण्यास विलंब लागला.
सचिन संजय लोळगे (३०, तेली गल्ली, रविवार पेठ) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. सचिन हा शनिवारी सकाळी सहा वाजता कंकालेश्वर कुंडात पोहण्यासाठी गेला होता. तो कुंडात उतरल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. यातच तो गंटांगळ्या खात पाण्यात बुडाला. परिसरातील लोकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर आरडोओरड केली. त्यानंतर नातेवाईकांसह नगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशिरा त्याचा शोध लावण्यात यश आले. सचिन याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
आठवड्यातील दुसरी घटना
पाण्यात बुडालेल्याला शोधण्यासाठी यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यापुर्वी बिंदुसरा धरणात एका तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आठवड्यापूर्वीच घडली होती. येथेही नातेवाईकांना शासकीय यंत्रणेची मदत न मिळाल्याने त्यांनी स्वखर्चातून बुडालेल्या तरूणाचा शोध घेतला होता. शनिवारीही सचिन लोळगे यांचा शोध घेण्यासाठी अग्निशमनशिवाय इतर कसलीच यंत्रणा उपलब्ध नव्हती.