महायुतीत कन्नड मतदारसंघ कोणाला? वाटाघाटीत भाजपचा दावा, मोठ्या नेत्याची मुलगी लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:16 PM2024-10-18T12:16:25+5:302024-10-18T12:19:54+5:30

महायुतीत कन्नड मतदारसंघ शिंदेसेनेकडे जाण्याची चर्चा; वाटाघाटीत भाजपने केला दावा

Kannada Constituency in Mahayuti? BJP's claim, the daughter of a senior leader will contest in the negotiations | महायुतीत कन्नड मतदारसंघ कोणाला? वाटाघाटीत भाजपचा दावा, मोठ्या नेत्याची मुलगी लढणार

महायुतीत कन्नड मतदारसंघ कोणाला? वाटाघाटीत भाजपचा दावा, मोठ्या नेत्याची मुलगी लढणार

छत्रपती संभाजीनगर : भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व मित्र पक्षांसह असलेल्या महायुतीच्या जागा वाटप होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन जागा भाजपकडे आहेत. पाच जागा शिंदेसेनेकडे आहेत. तर एक जागा उद्धवसेनेकडे आहे. भाजपने मतदारसंघ वाटाघाटीत कन्नड मतदारसंघावर दावा केला आहे. महायुतीमध्ये कन्नड हा मतदारसंघ कुणाकडेच नाही. कारण तेथे उद्धवसेनेचे वर्चस्व आहे. जिल्ह्यातील पाच मतदारसंघ शिंदेसेनेने लढावेत, तर चार मतदारसंघ भाजपने लढावेत, यासाठी भाजपचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे.

कन्नडमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणात काम केले आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्या मतदारसंघात सर्वाधिक जास्त कामे केली आहेत. त्यामुळे भाजपला तो मतदारसंघ मिळावा, अशी अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची फरपट झाली. विधानसभा निवडणुकीत तसा प्रकार होऊ नये, यासाठी भाजपने आत्तापासूनच कन्नडसाठी जोर लावण्यास सुरुवात केली आहे.

कन्नडवर शिंदेसेनेचा दावा
कन्नडची जागा शिंदेसेनेकडे जाणार असून तेथे भाजपच्या एका नेत्याच्या मुलीला निवडणूक मैदानात आणण्याची तयारी असल्याची चर्चा भाजप वर्तुळात सुरू झाल्यामुळे तेथील पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे जिल्ह्यात एक तरी मतदारसंघ पक्षाला वाढीव मिळावा. आणि तो मतदारसंघ कन्नड असावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नेत्यांकडे सुरू केली आहे. कन्नडमध्ये शिंदेसेनेचे नेटवर्क अपुरे तर भाजपचे नेटवर्क तळागाळापर्यंत असल्याने पक्षाने मतदारसंघ मागणीसाठी आघाडी घेतली आहे.

भाजपला एक मतदारसंघ वाढीव पाहिजे
जिल्ह्यात भाजपच्या फक्त तीन जागा आहेत. त्यामुळे आणखी एक जागा पक्षाला मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कन्नडची जागा महायुतीमध्ये कोणाकडेही नाही. त्यामुळे ती जागा भाजपला मिळावी, यासाठी तेथील पदाधिकारी, कार्यकर्ते मागणी करीत आहेत. जर महायुतीच्या वाटाघाटीत ती जागा शिंदेसेनेकडे गेली तर भाजपला दुसरा मतदारसंघ मिळावा, जेणेकरून भाजप तीन ऐवजी किमान चार जागांवर विधानसभा उमेदवार देईल.
-शिरीष बोराळकर, शहर-जिल्हाध्यक्ष भाजप

जिल्ह्यातील पक्षीय बलाबल असे...
भाजप: ३ (औरंगाबाद पूर्व, फुलंब्री, गंगापूर)
शिंदेसेना: ५ (औरंगाबाद मध्य, पश्चिम, वैजापूर, पैठण, सिल्लोड)
उद्धवसेना : १ (कन्नड)

काँग्रेस: ००
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार: ००
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार: ००

Web Title: Kannada Constituency in Mahayuti? BJP's claim, the daughter of a senior leader will contest in the negotiations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.