कन्नडमध्ये पोलिसांना धक्काबुकी करणारा नगरसेवक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 04:00 PM2020-02-20T16:00:07+5:302020-02-20T16:02:41+5:30
पोलिसांना केली धक्काबुकी
कन्नड : पोलिसांसोबत हुज्जत घालत धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून कन्नड परिषदेतील स्विकृत नगरसेवकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजमल खान उर्फ अथरभाईजी असे नगरसेवकाचे नाव असून पोलीसांनी त्यास अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अन्नाभाऊ साठे चौकात अवैधरित्या जनावरे घेऊन जाणारे दोन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोउपनि. बलभीम राऊत घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी कन्नड पालिकेचे स्विकृत नगरसेवक अजमल खान उर्फ अथरभाईजी ( रा. टिळकनगर ) मोठ्या जमावासह तेथे होते. यावेळी अजमल खान याने तुम्ही येथे कशाला आले, असे म्हणत गणवेषातील पोलीस नाईक चव्हाण यांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
तसेच पोनि. रामेश्वर रेंगे हे खाजगी कारमधुन सदर ठिकाणी ठिकाणी येऊन समजावून सांगण्यास गेले असता त्यांच्या कारवर पाठीमागच्या बाजूने दगड मारण्यात आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. बालाजी वैद्य करीत आहेत. नगरसेवक अजमल खान उर्फ अथरभाईजी यास अटक करण्यात आली आहे.