कराडांचा नगरसेवक ते महापौर प्रवास माझ्यामुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:02 AM2021-06-05T04:02:56+5:302021-06-05T04:02:56+5:30
औरंगाबाद : भाजपचे खा.डॉ.भागवत कराड यांचा नगरसेवक ते महापौर हा राजकीय प्रवास माझ्यामुळे झाला आहे. त्यामुळे आधी त्यांनी त्यांचे ...
औरंगाबाद : भाजपचे खा.डॉ.भागवत कराड यांचा नगरसेवक ते महापौर हा राजकीय प्रवास माझ्यामुळे झाला आहे. त्यामुळे आधी त्यांनी त्यांचे पहावे, मग माझ्याकडे बोट दाखवावे. लोकांच्या कामांसाठी अधिकाऱ्यांना बोलावे लागते, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी शुक्रवारी खा. डॉ.कराड यांच्या वक्तव्याप्रकरणी दिले.
शिवसेनेचे माजी खा. खैरे हे महापालिकेत लुडबुड करतात. मी खासदार आहे, त्यामुळे कोणती कामे कशी करायची याची मला जाण असल्याचा टोला खा.डॉ. कराड यांनी २ जून रोजी लगावला होता. खा.डॉ.कराड यांच्या टीकेला माजी खा.खैरे यांनी शुक्रवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. या दोन्ही उभयंतांची राजाबाजार येथे संस्थान गणपती येथेही एका विधीनिमित्त भेट झाली. या भेटीत शिवसेना-भाजप युतीवरून दोघांमध्ये उत्तर-प्रत्युत्तरेही झाली.
२ जून रोजी एन-४ मधील एका कार्यक्रमात खा.डॉ.कराड यांनी खैरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. माजी खा.खैरे यांनी वैधानिक पद नसतानाही सरकारी बैठकांचे सत्र सुरू केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची, त्यानंतर नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांची, सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक घेतल्याने प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येत आहे. त्यातच खा.कराड यांनी खैरे हे पालिकेत लुडबुड करीत असल्याची जाहीर टीका करून त्यांना डिवचले.
मी त्यांना जाब विचारला
लोकांसाठी अधिकाऱ्यांना बोलावे लागते. खा.कराड यांना त्यांच्या वक्तव्याप्रकरणी आज मी जाब विचारला. युती केली पाहिजे, अशी इच्छा त्यांनीच माझ्याकडे व्यक्त केली, असे माजी खा.खैरे यांनी सांगितले.
त्यांनाच लोकसभा लढायची
मला काही खासदारकी लढायची नाही. त्यांना पुन्हा लोकसभा लढण्याची इच्छा आहे. तेच मला आज भेटले होते. त्यांनी शिवसेना-भाजप युती होत असल्याचे मला सांगितले. यातून कुणाला कुणाची गरज आहे, हे स्पष्ट होते.