कर्जास कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:17 PM2017-07-30T13:17:31+5:302017-07-30T13:18:28+5:30
कर्जाचे हप्ते थकल्याच्या तणावाखाली असलेल्या बेला संजय पसरते (३२ ) या विवाहितेने राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि.३० : कर्जाचे हप्ते थकल्याच्या तणावाखाली असलेल्या बेला संजय पसरते (३२ ) या विवाहितेने राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सिडको एन-६ मधील सिंहगड कॉलनीत सकाळी ९ च्या सुमारास हि घटना घडली.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आज सकाळी बेला यांनी पती संजय यांच्यासोबत चहा घेतला. त्यानंतर बेला या बेडरूममध्ये गेल्या व संजय हालमधे पुन्हा झोपले. काही वेळानंतर झोपेतून उठल्यावर बेला या घरात दिसत नसल्याने संजय यांनी बेडरूमचा दरवाजा वाजवला. मात्र; आतून प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी दाराच्या फळीतून डोकावून पाहिले असता बेला यांनी साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले.
यानंतर त्यांनी घटनेची माहिती सिडको पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बेला यांना खाली उतरवून घाटी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कर्जाचे हप्ते थकले होते
घरातील खर्च उत्पन्नाच्या तुलनेत वाढल्याने त्यांना काही दिवसांपासून आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यामुळे त्यांनी बचतगटाकडून घेतलेल्या कर्जाचे काही हप्ते थकले होते. यातूनच त्या काही दिवसांपासून तणावात होत्या अशी चर्चा परिसरातील नागरिकात आहे.