कोरोनाग्रस्त माता अन् बाळ व्हिडिओ कॉलवरच होते संपर्कात, अनोख्या घटनेला ३ वर्ष पूर्ण
By संतोष हिरेमठ | Published: April 19, 2023 11:39 AM2023-04-19T11:39:47+5:302023-04-19T11:41:39+5:30
कोरोना काळात जन्मलेली करिना आठवते का? मातृत्वापुढे हरलेल्या कोरोनाच्या या घटनेला तीन वर्ष पूर्ण
छत्रपती संभाजीनगर : राज्यासह देशभरात चर्चा झालेली कोरोना काळात जन्मलेली ‘करिना’ आठवते का? छत्रपती संभाजीनगरमध्ये ३ वर्षांपूर्वी कोरोनाबाधित महिलेची जिल्हा रुग्णालयात सिझेरियन प्रसूती झाली होती. जन्मानंतर तब्बल २५ दिवस ही चिमुकली आईपासून दूर होती. त्या काळात ती माता फक्त व्हिडिओ काॅलिंगवरूनच नवजात मुलीला पाहत होती. हीच ती करिना. मातृत्वापुढे हरलेल्या कोरोनाच्या या घटनेला मंगळवारी ३ वर्षे पूर्ण झाले.
जाेगेश्वरी पश्चिम (मुंबई) येथून शहरात आलेल्या कोरोनाबाधित महिलेची जिल्हा सामान्य रुग्णालयात १८ एप्रिल २०२० रोजी सिझेरियन प्रसूती झाली. या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला. कोरोना प्रादुर्भावात अशा प्रकारची देशातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिलीच प्रसूती ठरली. नवजात मुलीला कोरोना होऊ नये, म्हणून तिला आईपासून दूर ठेवण्यात आले होते. प्रसूतीनंतर तब्बल २५ दिवस ही माता मुलीपासून दूर होती. तेव्हा ‘लोकमत’ प्रतिनिधीने सुचविलेल्या कल्पनेनंतर कोरोनाबाधित आई आणि मुलीची व्हिडिओ काॅलिंगद्वारे भेट घडविण्यात आली होती. तेव्हा ही बाब देशभरातील माध्यमांवरील चर्चेचा विषय ठरली होती. रुग्णालयातून सुटी होताना जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिकांनी या कोरोना गर्लचे नाव ‘करिना’ असे ठेवले. करिना मंगळवारी तीन वर्षांची होतेय. तिच्या जन्माचा तो काळ आणि आताची परिस्थिती यात खूप अंतर आहे, असे तिच्या आईने ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
व्हिडिओ काॅलनंतर आता रिल्स
जन्मानंतर काही तासांतच करिनाचा व्हिडिओ काॅलिंगद्वारे मोबाईलशी संबंध जोडला गेला. आता तीन वर्षांची असताना आईच्या मदतीने ती चित्रपटांच्या गीतांवर स्वत:चे रिल्सही तयार करीत आहे.