Kargil Victory Day: एका हातात रायफल, दुसऱ्या हातात ‘डाॅक्टर बॅग’ अन् वरून गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 04:08 PM2024-07-26T16:08:59+5:302024-07-26T16:10:10+5:30
कारगिल युद्धात मेडिकल असिस्टंट म्हणून कामगिरी; माजी सैनिक अशोक हंगे यांनी सांगितला विजयी अनुभव
छत्रपती संभाजीनगर : रक्त गोठवणारे उणे तापमान, त्यात २२ हजार फूट उंचीवरील टायगर हिल काबीज करून तेथून खालच्या काकसरा आणि दराज या गावात असलेल्या आपल्या सैनिकांच्या दिशेने गोळीबाराचा मारा करणारे पाकिस्तानी सैनिक, अशा परिस्थितीचा मुकाबला करीत भारतीय सैनिक पुढे सरकत होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात ‘डाॅक्टर बॅग’ घेऊन मीही पुढे सरकत होतो. भारतीय सैनिकांवर उपचाराची जबाबदारी पार पाडताना मीही रायफल चालवली. तब्बल ६० दिवस लढा दिल्यानंतर कारगिल विजय साकारला, अशा शब्दांत कारगिल युद्धात मेडिकल असिस्टंट म्हणून कामगिरी बजावणारे माजी सैनिक अशोक संभाजी हंगे यांनी अनुभवन कथन केले.
दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. हा दिवस १९९९ मध्ये कारगिल युद्धात भारतीय सैनिकांच्या विजय आणि त्यांच्या बलिदानाला सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. कारगिल युद्ध हे भारत आणि पाकिस्तान यांच्यात जम्मू आणि काश्मीरमधील कारगिल येथे होते. या युद्धात भारतीय सैन्याने उंच पर्वतीय प्रदेशांमध्ये कठोर परिस्थितींचा सामना करत शत्रूच्या ठिकाणांना नष्ट केले आणि विजय मिळवला. या युद्धात अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. कारगिल युद्धात मेडिकल असिस्टंट (आर्मी मेडिकल कोर) म्हणून जखमी सैनिकांवर प्रथमोपचार करण्याची सेवा केलेले माजी सैनिक अशोक संभाजी हंगे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यावेळच्या परिस्थितीला उजाळा दिला. कारगिल योद्धा असलेले हांगे यांना अनेक ‘मेडल्स’, ‘महाराष्ट्र भूषण’, ‘मराठवाडा भूषण’सह अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. मूळ लातूर येथील रहिवासी असलेले हंगे २००५ पासून पडेगाव येथे राहतात.
जखमी सैनिकाला पाठीवरून न्यावे लागत
अशोग हंगे म्हणाले, चारही बाजूंनी बर्फाचे डोंगर. त्यातून जाणारा नागमोडी रस्ता. तेथूनही एकच माणूस चालू शकेल अशी स्थिती. एखादा सैनिक जखमी झाला तर त्याला पाठीवर दराज किंवा काकसरा भागातील तळापर्यंत पोहोचावे लागते. अनेकदा रात्रीच्या वेळी हे काम चालायचे. पाकिस्तानी सैनिकांकडून होणाऱ्या गोळीबाराने दगडांचे तुकडेही सैनिकांच्या शरीरातील अवयवांमध्ये घुसायचे. अशा जखमी सैनिकाला ‘इमो ब्लाईज’ (अवयवाला हलू न देता) अवस्थेत पाठीवर न्यावे लागत असे. रक्तस्राव थांबविण्यासाठी प्रयत्न करावा लागत असे. ‘डाॅक्टर बॅग’मधील वैद्यकीय साहित्यांच्या मदतीने अनेकांवर प्राथमिक उपचार केले. प्रदीर्घ सेवेनंतर २००५ मध्ये सेवानिवृत्त झालो. आता माजी सैनिकांच्या प्रश्नांसाठी काम करतो. माझा मुलगा भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडरपदी नियुक्त झाला आहे.