करमाड रेल्वे अपघात : ५० वर लोकांची चौकशी; शेतकरी, सरपंच, पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 07:41 PM2020-05-12T19:41:24+5:302020-05-12T19:43:49+5:30
बदनापूर- करमाडदरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताची सोमवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सिकंदराबाद येथील रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी करण्यात आली.
औरंगाबाद : बदनापूर- करमाडदरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताची सोमवारी औरंगाबादरेल्वेस्टेशनवर सिकंदराबाद येथील रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी करण्यात आली. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या चौकशीत सायंकाळपर्यंत दोन शेतकरी, सरपंच, पोलीस पाटील, पोलीस, प्रशासकीय आणि रेल्वे अधिकारी-कर्मचारी, अशा ५० पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदविण्यात आले.
रेल्वे सुरक्षा आयुक्त राम कृपाल यांनी ही चौकशी केली. त्यासाठी जालना ते औरंगाबाद दरम्यानचे रेल्वे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. यात गेटमन, गँगमन, की मॅन, स्टेशन मास्तर यांची चौकशी करून जबाब नोंदविण्यात आले. त्यासाठी स्वतंत्र प्रश्नावली तयार करण्यात आली होती.
पोलीस अधिकाऱ्यांनीदेखील आपले जबाब नोंदविले. प्रत्यक्ष अपघाताच्या वेळी आणि अपघातानंतरच्या प्रत्येक माहितीची गंभीरतेने नोंद घेण्यात आली. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदरसिंग, रेल्वे सुरक्षा बलाचे आयजी रमेश चंद्रन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान ही चौकशी किमान सात दिवस चालेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रात्री पेट्रोलिंग नाही, गँगमन, की-मॅनची चौकशी
उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी रेल्वे रुळावर पेट्रोलिंगच करण्यात येत नसल्याची माहिती समोर आली आहे. नाईट पेट्रोलिंग ही केवळ पावसाळा आणि हिवाळ्यात होते. गँगमन, की-मॅन यांच्याकडून सध्या दिवसा पेट्रोलिंग केली जात असल्याची माहिती स्वत: रेल्वे व्यवस्थापकांनी दिली होती. मात्र, चौकशीसाठी गँगमन, की-मॅन यांना बोलावण्यात आल्याचे दिसून आले.
कंपनीतील लोकांची चौकशी
मयत मजूर ज्या कंपनीत कामाला होते, तेथील जबाबदार लोकांचीही चौकशी करण्यात आली. मजुरांशी संबंधित आवश्यक माहिती घेण्यात आल्याचे समजते.
सर्वसामान्य नागरिकांनी फिरविली पाठ
मालगाडीच्या अपघातासंबंधी काही माहिती असेल तर नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु या घटनेचे साक्षीदार म्हणून परिसरातील सरपंच, पोलीस पाटील, दोन शेतकरी, अशा चौघांनीच जबाब नोंदविले.
नागरी उड्डयन मंत्रालयाला देणार अहवाल
रेल्वे सुरक्षा आयुक्त हे नागरी उड्डयन मंत्रालयाकडून चौकशी करीत आहेत. चौकशीनंतर त्यांचा अहवाल नागरी उड्डयन मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाला दिला जाणार आहे. चौकशीचा हा पहिला दिवस आहे. चौकशी आणखी काही दिवस सुरू राहील. मंगळवारपासून नांदेड येथे चौकशी होईल, असे उपिंदरसिंग म्हणाले.
रेल्वे अपघाताची चौकशी १५ दिवस चालणार
करमाडजवळील सटाणा येथे रुळावर झोपलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांना मालवाहू रेल्वेने चिरडल्याचा अपघात शुक्रवारी पहाटे घडला. या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी चार सदस्यीय चौकशी समिती नेमली असून, समितीने सोमवारी प्राथमिक चौकशी केली. तीन दिवसांत समितीला अहवाल देणे शक्य नाही, त्यामुळे १५ दिवस वाढवून घेण्यात आले आहेत, असे समिती अध्यक्ष तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांनी सांगितले.
चौकशी समितीने या घटनेप्रकरणी सोमवारी काही जणांना चौकशीसाठी बोलावून प्राथमिक माहिती घेतली, असे समितीचे अध्यक्ष डॉ. बाणापुरे यांनी सांगितले. ही न्यायालयीन चौकशी समिती असून, त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, कामगार उपायुक्त हे सदस्य आहेत. समितीचे अध्यक्ष डॉ. बाणापुरे यांनी सांगितले, चौकशीच्या अनुषंगाने सोमवारी कंपनी मालकाला बोलावले होते; परंतु कंपनी मालक हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना समन्स काढण्यात येणार आहे.
चौकशी समितीला पडलेले प्रश्न
ते मजूर कधीपासून कामाला होते. त्यांना वेतन दिले होते काय, त्यांची कंपनी आवारात राहण्याची व्यवस्था केली होती का, मजुरांची माहिती स्थानिक प्रशासनाला दिला होती काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कंपनी मालकाकडून घेण्यात येणार आहेत, तसेच मोटरमन, स्टेशन मास्तर, कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांना काही माहिती विचारण्यात येणार आहे. या घटनेबाबत कुणाला काही आक्षेप असेल, तर तो ७ दिवसांत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.