तब्बल ३५० वर्षांची यात्रेची परंपरा, देवीच्या भक्तांसाठी सजतोय कर्णपुरा
By प्रशांत तेलवाडकर | Published: September 17, 2022 06:31 PM2022-09-17T18:31:32+5:302022-09-17T18:32:53+5:30
निर्बंधमुक्त वातावरणात लुटता येणार यात्रेचा आनंद
औरंगाबाद : तब्बल ३५० वर्षांची परंपरा असेलेले कर्णपुरा येथील देवीचे मंदिर भाविकांच्या स्वागतासाठी सजत आहे. मंदिरात रंगरंगोटी, मंडप टाकण्यास सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे मैदानावर राज्य-परराज्यांतून यात्रेचे साहित्य येण्यास आरंभ झाला आहे.
कर्णपुरा यात्रेत देवीचे दर्शन व नंतर यात्रेचा आनंद लुटल्याशिवाय औरंगाबादकरांना नवरात्रोत्सव साजरा केल्यासारखे वाटतच नाही. कोरोना संसर्गाच्या संकटामुळे मागील दोन वर्षे देवीचे दर्शन व यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र, यंदा शासनाने निर्बंधमुक्त वातावरणात सण साजरे करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे २६ सप्टेंबरपासून कर्णपुरा यात्रा सुरू होईल व त्याचा आनंद भाविकांना घेता येणार आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
श्रद्धास्थान असलेली कर्णपुरातील देवीचे मंदिर भाविकांच्या स्वागतासाठी सजत आहे. येथे मंदिराबाहेर कम्पाऊंड वॉल उभारण्यात आली आहे. मंदिरात विद्युत व्यवस्थेची दुरुस्ती व रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मंदिरासमोर मंडप उभारण्यात आला आहे. दररोज येणारा पाऊस लक्षात घेता मंदिराच्या पाठीमागेही पत्र्याचे शेड उभारण्यात येत आहे. अशीच रंगरंगोटी येथील बालाजी मंदिरातही केली जात आहे. कर्णपुरा यात्रेला आठ दिवस शिल्लक राहिले असताना मैदानात खेळणीचे साहित्य येण्यास सुरुवात झाली आहे. यात रहाटपाळणा, ब्रेकडान्स झुलाचे सामान येऊ लागले आहे. शनिवारच्या आधी यात्रेत संपूर्ण स्टॉल उभे राहतील.