महिन्यातून आठवडा कसाबसा भरतो, त्यात कुटुंबाची अर्धपोटी गुजराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:05 AM2021-05-21T04:05:22+5:302021-05-21T04:05:22+5:30
औरंगाबाद : मोलमजुरीत अख्खे कुटुंब राबते, पण लॉकडाऊनमुळे नाक्यावर कामच मिळत नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
औरंगाबाद : मोलमजुरीत अख्खे कुटुंब राबते, पण लॉकडाऊनमुळे नाक्यावर कामच मिळत नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिन्यातून जेमतेम आठ दिवसच हाताला काम मिळते अन् त्यातूनच कुटुंबाची अर्धपोटी गुजराण करावी लागत आहे, अशी व्यथा मजुरांनी मांडली आहे.
शासनाने मजुरांच्या खात्यात पैसा जमा करण्याची घोषणा केली. परंतु ती अद्याप आम्हाला मिळालेली नाही. दररोज सकाळी नाक्यावर येऊन कोणी मोलमजुरीसाठी बोलावते का, या आशेवर जातो. कधी कधी तर संपूर्ण दिवस वाट पाहण्यातच जातो. तर कधी कधी तसाच घराचा रस्ता धरावा लागतो. पोट भरण्यासाठी कुटुंबासमवेत शहरात आले आणि दररोज मजुरीसाठी मुले आणि स्वत:देखील नाक्यावर येताे. एकाच दिवशी प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल, याची खात्रीच नसते. अख्खे कुटुंब राबूनही पोटाला पोटभर मिळत नाही.
लॉकडाऊनच्या भीतीने रस्त्यावर जास्त वेळ थांबता येत नाही. पोलिसांच्या छडीचा प्रसाद खावा लागतो. लॉकडाऊन लागल्यापासून खूप कमी कामे सुरू आहेत. परंतु रोजी नाही, परंतु कुणी तरी सेवाभावी संस्था रेशन किंवा अन्नाचे पाकीट घेऊन नाक्यावर येतात. त्यातूनच कुटुंबासमवेत दोन घास खात लॉकडाऊनमध्ये जीवन जगणे सुरू आहे.
खिशात दमडी पडली नाही
पहाटेपासून बसून राहिलो अद्याप कोणीही कामावर घेऊन जाणारा फिरकला नाही. पोटाला किती दिवस पीळ घेत जगायचे, असा प्रश्न उभा राहतो. शासनाची दमडी खिशात पडलेली नाही, आधार लिंक करा, नूतनीकरण करा, पासबुक द्या, असे अनेकदा सांगितले जाते. परंतु कुणीही मदतीला धावून आले नाही.
- पिराजी शंकर गायडवाड (मजूर, मांडकी)
साहेब कष्टाशिवाय पर्याय नाही
दिवसभर राबराब राबायचे आणि सायंकाळी मिळणाऱ्या मजुरीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. सरकारने पैसे टाकले, असे म्हणतात. परंतु आमच्या नशिबी नाही, साहेब फक्त कष्टावर आमचा विश्वास आहे. तेव्हाच दोन घास पोटाला मिळतात.
- रूस्तुम सावळाराम दुकले (मजूर, पाचोड)