कशीश खून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा; शीख समुदायाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 04:37 PM2022-05-25T16:37:58+5:302022-05-25T16:38:22+5:30
Kashish murder case फास्टट्रॅक कोर्टात खटला निकाली काढून आरोपीस कडक शिक्षा दिल्यास पुन्हा कोणी असा गुन्हा करण्यास धजावणार नाही, असे मत यावेळी शिष्ट मंडळाने व्यक्त केले.
औरंगाबाद: महाविद्यालय परिसरातील कॅफेसमोरून ओढत नेत एकतर्फी प्रेमातून तरुणीची गळा चिरून हत्या केल्याच्या घटनेने औरंगाबादसह संपूर्ण राज्य हादरले होते. या प्रकरणी शहरवासियांमध्ये संतापाच्या भावना आहेत. हा खून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी शिख समुदायाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे आज केली.
देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या सुखप्रीत ऊर्फ कशीश कौर प्रीतपालसिंग ग्रंथी (१८) या विद्यार्थिनीची रचनाकार कॉलनीतील रिकाम्या प्लॉटमध्ये ओढत नेऊन २१ मे रोजी दुपारी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. यामुळे शहरासह राज्य हादरून गेले होते. यावेळी अनेकांनी केवळ बघ्यांची भूमिका घेतल्याचेही पुढे आले आहे. शहरात अशा घटना होऊ नयेत म्हणून नागरिकांनी जागरूक राहावे. तसेच आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा द्यावी, यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा,अशी मागणी शीख समुदायाने आज जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनातून केली. फास्टट्रॅक कोर्टात खटला निकाली काढून आरोपीस कडक शिक्षा दिल्यास पुन्हा कोणी असा गुन्हा करण्यास धजावणार नाही, असे मत यावेळी शिष्ट मंडळाने व्यक्त केले.
काय आहे कशीश हत्या प्रकरण
आरोपी शरणने दिलेल्या माहितीनुसार, तो कशीशवर मागील पाच वर्षांपासून एकतर्फी प्रेम करीत होता. दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. तो दहावी नापास झाल्यानंतर गॅरेजवर कामाला लागला. कशीशने बारावी पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयात बीबीएला प्रवेश घेतला. महाविद्यालयात ती मित्र-मैत्रिणींसोबत राहायची. शरणला त्याच्या मित्राने कशीशची मैत्री तीन मुलांसोबत जमली असून, तुला आता ती मिळणार नसल्याचे सांगितले. शनिवारी महाविद्यालयाच्या गेटबाहेरील एका कॅफेमध्ये कशीश तीन मित्र आणि मैत्रिणींसोबत कॉफी पिण्यासाठी गेली होती. तो मागेच आला. कशीशचे त्या तीन मुलांसोबत प्रकरण असल्याचा त्याला संशय होता. या संशयातूनच त्याने कशीशला शपथ घालून पाच मिनिटे बाेलायचे असल्याचा बहाणा करून कॅफेबाहेर बाेलावून घेतले. कशीश बाहेर आल्यानंतर त्याने तिच्यावर संशय व्यक्त केला. तेव्हा तिने त्यास नकार देत निघून जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे त्याने तिला कॅफेसमोरच २०० फूट अंतरावर असलेल्या मोकळ्या प्लॉटच्या दिशेने ओढत नेले. माझी होऊ शकत नाहीस तर कोणाचीही होऊ देणार नाही, असे म्हणत सोबत असलेल्या हत्याराने तिच्यावर १८ वार केल्याची माहिती शरणने पोलिसांना दिली.