औरंगाबादेत कश्यप गँगच्या गुंडांचा धुमाकूळ; युवकावर खुनी हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 01:40 PM2022-02-07T13:40:27+5:302022-02-07T13:40:36+5:30
जखमी युवक खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये शेवटच्या घटका मोजत असून, त्याच्या डोक्याला तब्बल ७० टाके पडल्याची माहिती समोर आली आहे.
औरंगाबाद : भारतनगर परिसरात कुख्यात गुंड दुर्लभ कश्यप नावाचा चौक उभा करणाऱ्या कश्यप गँगने रेणुकानगरमध्ये धुमाकूळ घालत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकाच्या डोक्यात फायटर आणि तलवारीने वार करीत गंभीर जखमी केले. काहींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा युवक खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये शेवटच्या घटका मोजत असून, त्याच्या डोक्याला तब्बल ७० टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील ५ आरोपींना पुंडलिकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
शिवाजीनगर भागातील साईनगर येथे शुभम विनायक मनगटे (२४) हा युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. शनिवारी रात्री १० वाजता कश्यप गँगचे राजू पठाडे, यश पाखरे, शुभम मोरे, अतिश मोरे, शेख बादशाह शेख बाबा, नीलेश धस, पिन्या खडके याच्यासह इतर दोन अनोळखी मुलांनी शुभम याच्या किराणा दुकान आणि घरासमोर येत बाहेरून लाथाबुक्क्या मारून दुकान उघडण्याची मागणी केली. तेव्हा घरात शुभमची आई- वडील आणि लहान भाऊ होता. त्यांनी दरवाजा उघडला नाही. शुभम एका लग्नाहून घरी आल्यानंतर त्यास हे समजले.
आरोपी यश पाखरेला मावस भाऊ राजू पठाडे याच्यामार्फत समजावून सांगावे, यासाठी शुभम मित्रासोबत पठाडेच्या रेणुकानगर येथील घरी गेला. वरील सर्व हल्लेखोर तेथे आले. त्यांनी शुभमला शिवीगाळ केली. पाखरे याने शुभमच्या डोक्यात फायटरने वार केले. शुभम मोरे याने डोके, भुवईवर तलवारीने वार केले. इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शुभम बेशुद्ध पडल्यानंतर हल्लेखोर तेथून निघून गेले. जखमी शुभमच्या वडिलांना त्याच्या मित्राने माहिती दिली. त्यानंतर त्यास खाजगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदवला असून यश पाखरे, शुभम मोरे, अतिष मोरे, शेख बादशाह, पिन्या खडके यांना बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास सहायक निरीक्षक शेषराव खटाणे करीत आहेत.