केवड्याचा सुगंध मुंबईपर्यंत
By Admin | Published: September 1, 2014 12:40 AM2014-09-01T00:40:43+5:302014-09-01T17:13:19+5:30
गणेशोत्सव सुरू झाला आणि माळीवाड्यातील केवड्याचा सुगंध पुणे-मुंबईपर्यंत जाऊन पोहोचला.
औरंगाबाद : गणेशोत्सव सुरू झाला आणि माळीवाड्यातील केवड्याचा सुगंध पुणे-मुंबईपर्यंत जाऊन पोहोचला. शहरालगत माळीवाड्यात नागजरी नदीच्या काठी असलेले ‘केवडा बन’ महाराष्ट्रात तिसऱ्या नंबरचे आहे. पूर्वी या परिसरात केवड्याची झाडे १५ हजारांपेक्षा अधिक होती. मात्र, असंतुलित पर्जन्यमान, वाढते प्रदूषण यामुळे या बनात जुनी केवळ ४० झाडे उरली आहेत.
महाराष्ट्रात तीन जिल्ह्यांतच केवड्याचे तुरळक बन शिल्लक राहिले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा, उस्मानाबाद जिल्ह्यातील पापनस बन व सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील वाकरी येथील केवडा बनाचा समावेश होतो. दौलताबाद किल्ल्यामागील बाजूस असलेले माळीवाडा गाव केवड्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. गावातील नागजरी नदीच्या काठावरील चार एकर जमिनीवर केवड्याची झाडे आहेत. देवगिरी किल्ल्याच्या इतिहासात १३ व्या शतकात यादवांचे राज्य होते. त्यावेळी येथील केवड्यापासून सुवासिक अत्तर केले जात असे. स्वातंत्रपूर्व काळापर्यंत येथे अत्तर बनविले जात होते. तेव्हा नागजरी नदी परिसरात सात एकर शेतात १५ हजारांपेक्षा अधिक झाडे होती. १९७२ च्या दुष्काळात अनेक झाडे वाळली. मागील दशकात दोनदा वादळामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटून मोठे नुकसान झाले होते. नदीतील रसायनयुक्त पाण्याचाही परिणाम झाडांवर झाला. मागील १० वर्षांत अनेक झाडे जळून गेली. आजघडीला चार एकर क्षेत्रांत ४० जुनी झाडे तग धरून आहेत. येथील शेतकऱ्यांनी नवीन झाडे लावली. १० वर्षे झाली तरी अजून त्यांना कणसे आली नाहीत.
शेतकरी दिलीप गाणार यांनी सांगितले की, केवड्याचे झाड ३० ते ३५ फूट उंच वाढते. या झाडांना वर्षातून एकदाच कणसे येतात. केवड्यात दोन जाती असतात. एककेवडी एक जात असते. यास कणीस नसते व सुगंधही नसतो. दुसरी जातीच्या केवड्यास कणीस असते व त्याला सुगंध असतो. केवडा श्रावणात बहरतो आणि भाद्रपद महिना संपता संपता उतरणीला लागतो. केवड्याच्या एका झाडाला ४०० ते ५०० कणसे येतात. एका केवड्यास १२ ते १५ पाने असतात व तेवढीच छोटी-छोटी कणसे असतात. एक अख्खा केवडा ५०० ते ५५० रुपयांना विक्री होतो. बाजारात येत असलेला केवडा तीन पाने व कणसाचा छोटा तुकडा असलेला असतो. अख्खे कणीस ग्राहकांना पाहावयास मिळतच नाही.