थोड्या प्रसूती कळा सहन करा, लिफ्टमधून सामान येत आहे; रुग्णांना कमी अन साहित्य ने-आण्यात जास्त वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 12:20 PM2022-02-15T12:20:42+5:302022-02-15T12:22:40+5:30

उद्वाहनाचा वापर रुग्णांसाठी कमी, कर्मचाऱ्यांच्या कामासाठीच जास्त !

keep it labor pain, luggage coming out of the elevator, incident from ghati hospital | थोड्या प्रसूती कळा सहन करा, लिफ्टमधून सामान येत आहे; रुग्णांना कमी अन साहित्य ने-आण्यात जास्त वापर

थोड्या प्रसूती कळा सहन करा, लिफ्टमधून सामान येत आहे; रुग्णांना कमी अन साहित्य ने-आण्यात जास्त वापर

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : तळमजल्यावर असह्य प्रसूती कळांनी गरोदर माता विव्हळत होती. स्ट्रेचर ढकलणारे नातेवाईक लिफ्ट (उद्वाहन) येण्याची वाट पाहत होते. पण लिफ्ट काही केल्या येत नव्हती. कारण वरच्या मजल्यावरून लिफ्टमधून सामान येते. लिफ्टमधून साहित्याची ने-आण करण्यामुळे हा प्रकार होत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले.

घाटीत तळमजल्यावर ३ लिफ्ट आहेत. लिफ्ट ‘केवळ रुग्णांसाठी आहे’ अशा सूचना लिहिल्या आहेत. याचा वापर खरेच रुग्णांसाठी होतो का, याची ‘स्टिंग ऑपरेशन’मधून पडताळणी करण्यात आली. परंतु हा वापर रुग्णांसाठी कमी, कर्मचाऱ्यांकडून कामकाजासाठीच जास्त वापर होत आहे. जड सामान लिफ्टमधून नेणे योग्य आहे. परंतु साध्या गोष्टींसाठी स्ट्रेचर आणि लिफ्टचा विनाकारण वापर होत असल्याचे दिसले.

काय आढळले रुग्णालयात ?
पहिला प्रकार

दुपारी एकच्या सुमारास अपघात विभागातून दोन महिला आणि एक पुरुष स्ट्रेचरवरून गरोदर मातेला घेऊन प्रसूती विभागाकडे निघाले. तळमजल्यावरील लिफ्टमन लिफ्टचे बटण दाबत होता. परंतु लिफ्ट येत नव्हती. महिलेला कळा असह्य झाल्या होत्या. बराच वेळ होऊनही लिफ्ट येत नव्हती. हा प्रकार मोबाइलमध्ये कैद होत असल्याचे लक्षात येताच लिफ्टमनने त्यांना नेत्ररोग विभागाजवळील लिफ्टमधून रवाना केले. त्याच वेळी जी लिफ्ट येत नव्हती, त्यातून सामानाची ने-आण होताना दिसले.

दुसरा प्रकार
लिफ्ट क्रमांक दोनसमोर दोन स्ट्रेचरवर रुग्णालयातील विविध सामान ठेवून कर्मचारी उभे होते. एका व्हीलचेअरवर एक रुग्ण बसून होता. रुग्णाला आधी जाऊ देण्याआधी सामान लिफ्टमधून घेऊन जाण्याची चढाओढच दिसली. इतर रुग्ण पायऱ्यांनी जात होते.

तिसरा प्रकार
अपघात विभागातून एक गरोदर माता नातेवाइकासह लिफ्टकडे येत होती. त्याच वेळी तिच्या मागून स्ट्रेचरवरून सामान घेऊन कर्मचारी येत होता. समोर रुग्ण आहे, याचा विचार न करता वेगाने पुढे जाताना स्ट्रेचरचा जोरदार धक्का गरोदर मातेला लागला. धक्क्यामुळे बिचारी बाजूला झाली.

सूचना केल्या जातील
लिफ्टमधून आधी रुग्णांना घेऊन जाण्याची सूचना लिफ्टमनला केली जाईल. लिफ्ट या रुग्णांसाठीच आहे. स्टोअरसाठी वेगळी लिफ्ट आहे. इतर ३ लिफ्ट मोठ्या असल्याने तेथून स्टेचरवर सामान नेले जाते. परंतु रुग्णांची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष दिले जाईल.
- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, उपअधिष्ठाता तथा स्त्रीरोग विभागप्रमुख

Web Title: keep it labor pain, luggage coming out of the elevator, incident from ghati hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.