कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवा!
By Admin | Published: September 8, 2014 12:06 AM2014-09-08T00:06:28+5:302014-09-08T00:57:10+5:30
बीड: गणेश विसर्जनाच्या वेळी शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गणेश विसर्जन शांततेत व उत्साहात पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले आहे.
बीड: गणेश विसर्जनाच्या वेळी शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गणेश विसर्जन शांततेत व उत्साहात पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त सोमवारी शहरात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. या संबंधाने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी गणेश विसर्जन मार्गाची पाहणी केली. त्यावेळी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक माधव कारभारी, बीडच्या तहसीलदार ज्योती पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे, वाहतूक शाखेचे रमेश घोडके, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एच. केंद्रे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राम यांनी गणेश विसर्जन मार्गावरील ज्या विद्युत तारा खाली आल्या आहेत त्या व्यवस्थित व सुरक्षित अंतरापर्यंत ओढून घ्याव्यात, उघड्या डीपीवर झाकणे लावावीत, रस्त्यावर खड्डे बुजवावेत, रस्त्याच्या कडेला असलेल्या कचराकुंड्या काढून घ्याव्यात, ज्याठिकाणी गणे विसर्जन करण्यात येणार आहे त्या विहिरीतील गाळ काढून घ्यावा आदी सूचना करुन गणेश विसर्जन मिरवणुकीस गालबोट लागणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी पोलीस विभागामार्फत गणेश विसर्जनाचा बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था आदींचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राम यांनी कारंजा, पिंगळे गल्ली, बुंदेलपुरा, कबाडगल्ली, धोंडीपुरा, बलभीम चौक, जुनाबाजार मार्गे, कनकालेश्वर मंदिर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पेठ बीड या मार्गाची पाहणी करुन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
डीजे लावू नका
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ७५ डेसीबलच्या वर आवाज राहणार नाही, असे संगीत, वाद्य वाजवू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. डीजेचा आवाज १२५ डेसीबलच्या वर सुरू होतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होईल. तसेच नवजात बालके व अबालवृद्धांनाही याचा धोका संभवतो. त्यामुळे गणेश मंडळाच्या सदस्यांनी मिरवणुकीसाठी डीजे लावू नये, असे आवाहन विभागीय पोलीस उपअधीक्षक अभय डोंगरे यांनी केले आहे.
दरम्यान, औद्योगिक भागासाठी ७५ डेसीबल तर वस्ती भागासाठी ६५ डेसीबलची मर्यादा आखून देण्यात आलेली आहे. आवाजमुळे ध्वनी प्रदूषण होते, यासाठी मोठी वाद्ये वाजवू नयेत, अशा सूचना गणेश मंडळांना संबंधित पोलीस ठाण्यांनी वेळोवेळी दिलेल्या आहेत. गणेश मिरवणुकीदरम्यान डीजे लावणाऱ्यावर कारवाई करू. तसेच डीजे चालकावर कारवाई करण्यात येणार आहे. गणेश विसर्जन शांततेत व कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता पार पाडावे, असे आवाहन पोलिसांनी केले. (प्रतिनिधी)