भ्रष्टाचारमुक्त कार्यालय ठेवा; दर्जेदार काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:45 PM2019-02-11T22:45:55+5:302019-02-11T22:47:54+5:30
विभागीय आयुक्त कार्यालय भ्रष्टाचार मुक्त आणि दर्जेदार काम करण्याची तयारी ठेवावी. पूर्ण विभागात खालपर्यंत असा संदेश द्यावा, असे आवाहन नवनियुक्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आयुक्तालयातील विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना केले. मावळते आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्याकडून पदाची सूत्रे घेतल्यानंतर केंद्रेकर यांनी विभागातील महत्त्वाच्या मुद्यांचा आढावा घेतला.
औरंगाबाद : विभागीय आयुक्त कार्यालय भ्रष्टाचार मुक्त आणि दर्जेदार काम करण्याची तयारी ठेवावी. पूर्ण विभागात खालपर्यंत असा संदेश द्यावा, असे आवाहन नवनियुक्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आयुक्तालयातील विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना केले. मावळते आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्याकडून पदाची सूत्रे घेतल्यानंतर केंद्रेकर यांनी विभागातील महत्त्वाच्या मुद्यांचा आढावा घेतला.
सगळ्या विभागप्रमुखांना केंद्रेकर यांनी सांगितले, यापुढे कामावर फोकस करा, दर्जेदार काम करण्याकडे लक्ष द्या. ज्याचे जे काम आहे, त्या विभागाची संक्षिप्त टिप्पणी रोजनिशी माझ्याकडे देण्यात यावी. माझ्या परवानगीविना कुठलीही माहिती बाहेर जाता कामा नये, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी. बैठक सुरू होण्यापूर्वी माहिती व जनसंपर्क खात्यातील अधिकाºयांनाही केंद्रेकर यांनी बाहेर जाण्यास सांगितले. मराठवाड्यातील दुष्काळाबाबतची माहिती केंद्रेकर यांनी जाणून घेतली.
२००२ च्या आयएएस बॅचचे अधिकारी केंद्रेकर यांनी औरंगाबादेत विक्रीकर सहआयुक्त, सिडकोचे मुख्य प्रशासक तसेच प्रभारी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, बीड जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. राज्य कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्तपदी कार्यरत असताना त्यांची नियुक्ती येथे विभागीय आयुक्तपदी करण्यात आली. पदभार घेतल्यानंतर झालेल्या ओळख परेडला अपर आयुक्त डॉ.विजयकुमार फड, उपायुक्त वर्षा ठाकूर, पारस बोथरा, साधना सावरकर, उपायुक्त सूर्यकांत हजारे, पाटोदकर, सरिता सुत्रावे, माहिती संचालक यशवंत भंडारे आदींची उपस्थिती होती.
ब्युरोक्रॅटस्ने फेसलेस राहावे
पदभार घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रेकर म्हणाले, मी आज काही बोलणार नाही, पण ब्युरोक्रॅटस्ने फेसलेस (कुठलाही चेहरा नसलेला) राहिले पाहिजे, तसाच मी राहील. (मागील वर्षभरात भापकर यांचे नाव राजकीय पक्षात प्रवेश करण्याबाबत जोडले गेले. त्यामुळे पदभार घेताच केंद्रेकर यांनी ‘ब्युरोक्रॅटस्ने फेसलेस’ असावे असे वक्तव्य करून एकप्रकारे मावळते आयुक्त डॉ.भापकर यांना टोला मारल्याची चर्चा होती.) विभागात काही आव्हाने आहेत. ते हाताळण्याचा पूर्ण प्रयत्न करू. विभागातील जी परिस्थिती असेल, त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करील. सर्व विषयांचा आढावा घेईल. वर्षभरापूर्वी बदली झाली होती. ती यावर्षी फलदू्रप झाली आहे, आनंदी आहात का? यावर केंद्रेकर यांनी ‘नो कॉमेंटस्’ असे उत्तर दिले. त्यानंतर ते म्हणाले, सरकारी नोकर आहे, कुठेही काम करावे लागेल.
आठवडाभराचे क्रीडा आयुक्त भापकर
डॉ.भापकर यांची राज्य क्रीडा आयुक्त पुणे येथे बदली झाली असून ते लगेच पदभार घेणार नाहीत. तीन ते चार दिवसांनी ते पदभार घेतील. २८ फेबु्रवारी त्यांची सेवानिवृत्ती तारीख आहे. सर्व सुट्ट्या वगळून १२ दिवसांचा कालावधी त्यांना मिळतो आहे. त्यातही चार दिवसांनी पदभार घेणार असल्यामुळे ते आठवडाभराचे क्रीडा आयुक्त ठरणार आहेत.
-------------