पंप हाऊसचा विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:05 AM2021-05-12T04:05:12+5:302021-05-12T04:05:12+5:30
पैठण : पंप हाऊसचा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी अखंडित राहण्यासाठी रिंग मेन युनिट यंत्रणा पैठण नगरपरिषदेने कार्यान्वित करून घ्यावी, अशा ...
पैठण : पंप हाऊसचा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी अखंडित राहण्यासाठी रिंग मेन युनिट यंत्रणा पैठण नगरपरिषदेने कार्यान्वित करून घ्यावी, अशा सूचना महावितरणचे कार्यकारी अभियंता दीपक माने यांनी आज तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या.
दरम्यान, पंप हाऊसचा विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश माने यांनी महावितरण यंत्रणेला दिले.
पंप हाऊसचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे पैठण शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने रविवारी मध्यरात्री नगराध्यक्ष सुरज लोळगे व नगरसेवकांनी पोलीस ठाण्यात जाऊन महावितरण अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी महावितरण व न.प. प्रशासनाची मंगळवारी तहसील कार्यालयात बैठक घेतली. बैठकीत नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पाढा वाचताना, केवळ महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचा आरोप केला. महावितरणचा विद्युत पुरवठा कधीही खंडित होत असल्याने, शहरात विजेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे शिवसेनेचे गटनेते तुषार पाटील यांनी महावितरणच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी पाणीपुरवठा सभापती अजित पगारे, शिवसेनेचे गटनेते तुषार पाटील, राकाँचे गटनेते कल्याण भुकेले, काँग्रेसचे गटनेते हसनोद्दीन कट्यारे, नगरसेवक प्रकाश वानोळे, ज्ञानेश घोडके, नगरसेविका पुष्पा वानोळे, कृष्णा मापारी, बंडू आंधळे, विशाल पोहेकर, पाणीपुरवठा निरीक्षक व्यंकटी पापुलवार, पाणीपुरवठा अभियंता यशवंत मुंढे, भगवान कुलकर्णी, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक माने आदी उपस्थित होते.