नोकरदारांची अपडेट माहिती ठेवा; औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 06:22 PM2018-08-25T18:22:35+5:302018-08-25T18:22:59+5:30
शहरासह जिल्ह्यातील सर्व ४० हजार लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील नोकर, कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती सतत अद्ययावत ठेवण्याचे आदेश जिल्हा व्यापारी महासंघाने दिले आहेत.
औरंगाबाद : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात शहरातील एका व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या सनातनच्या एका कार्यकर्त्याला अटक झाल्याने शहरासह जिल्ह्यातील सर्व ४० हजार लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील नोकर, कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती सतत अद्ययावत ठेवण्याचे आदेश जिल्हा व्यापारी महासंघाने दिले आहेत.
जिल्ह्यात ४० हजार लहान-मोठे व्यापारी आहेत. त्यातील १७ हजार व्यापारी शहरात आहेत. यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक व्यापारी असे आहेत की, त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचारी, नोकरांचे फोटो, संपूर्ण बायोडाटा नाही. कारण, आजही अनेक दुकानांत नोकरांना दररोज पगार दिला जातो. त्यातही बहुतांश व्यापारी आजही पगारात रोख रक्कम देतात. जे जुने विश्वासू कर्मचारी, नोकर आहेत, त्यांची व्यापाऱ्यांना संपूर्ण माहिती आहे; पण त्याचे लेखी रेकॉर्ड नाही किंवा त्यांची संपूर्ण माहिती असलेली स्वतंत्र फाईल नाही. याचाच काही जणांनी गैरफायदा घेत गल्यावरच हात साफ केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, याची पोलिसांत तक्रार केली जात नसल्याने त्या नोकरांवर कारवाई होऊ शकली नाही. नुकतेच निराला बाजार परिसरातील एका कपड्यांच्या दुकानातील कर्मचाऱ्याला एटीएसने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याच्या संशयावरून अटक केली.
या घटनेमुळे सर्वांना धक्काच बसला. यासाठी यापुढे व्यापाऱ्यांनी आपल्याकडील नोकरदारांची संपूर्ण अद्ययावत माहिती ठेवण्याचे आदेश व्यापारी महासंघाने दिले. यासंदर्भात महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, दुकानांमध्ये अनेक नोकरदार असे आहेत की, ते अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे काम करतात. मात्र, आता व्यापाऱ्यांना आपल्याकडील नोकरदारांची संपूर्ण माहिती ठेवणे आवश्यक झाले आहेत. दुकानातील जुने व नवीन कर्मचारी सर्वांचे फोटो, बायोडाटा, आधार कार्ड, रहिवासी असल्याचा पुरावा, अशा संपूर्ण कागदोपत्रांची फाईल व्यापाऱ्यांनी ठेवावी. यासाठी महासंघातर्फे एक नोटीस काढण्यात आली आहे.येत्या आठवडाभरात ही नोटीस शहरातील ७२ व्यापारी संघटनांमार्फत सर्व व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचेल. व्यापारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही अशी माहिती अद्ययावत ठेवणे योग्य आहे.
मराठवाडा चेम्बरची ७ रोजी बैठक
मराठवाडा चेम्बर आॅफ ट्रेड अॅण्ड कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालानी यांनी सांगितले की, ७ सप्टेंबर रोजी संघटनेची बैठक बीड येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यात अनेक विषय आहेत. त्यात व्यापाऱ्यांनी आपल्याकडील कर्मचाऱ्यांची अद्ययावत संपूर्ण माहितीची कागदपत्रे ठेवण्याचा विषय आहे.
या विषयावर चर्चा होऊन तो मराठवाड्यात लागू करण्यात येईल. मराठवाड्यात ३ लाखांपेक्षा अधिक व्यापारी आहेत. त्यांच्याकडील नोकरदारांचे फोटो, बायोडाटा तसेच आधार कार्डची झेरॉक्ससुद्धा व्यापाऱ्यांनी ठेवावी, असाही निर्णय घेण्यात येणार आहे.
नोटाबंदी, जीएसटीनंतर बदलली परिस्थिती
नोटाबंदीआधी अनेक व्यापारी नोकरदारांना पगारात रोख रक्कम देत असत. मात्र, आता धनादेश देण्याचे प्रमाण वाढले आहे. आता जीएसटीमुळे सर्व व्यवहार बँकेतून केले जात आहेत. ज्यांनी जीएसटीएनमध्ये नोंदणी केली आहे, असे व्यापारी थेट नोकरदारांच्या बँक खात्यात रक्कम जमा करीत आहेत.