ध्येयाप्रती निष्ठा ठेवा, जिद्द पक्की असू द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:01 AM2017-09-05T01:01:17+5:302017-09-05T01:01:17+5:30
ध्येयाप्रती निष्ठा ठेवा, मनात जिद्द पक्की असू द्या, अशा शब्दांत उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी महिलांना आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘आपण जसा विचार करतो, तसेच घडते’ हा सहा शब्दांचा मंत्र पूर्णपणे आत्मसात करा. हा मंत्र तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो, कारण आपल्या विचारांचा परिणामच आपल्या कृतींवर होत असतो. आपले पाय मागे खेचण्यासाठी इतरांची गरज नसते, तर आपण स्वत:च त्याला कारणीभूत असतो. त्यामुळे आपल्या ध्येयाप्रती निष्ठा ठेवा, मनात जिद्द पक्की असू द्या, अशा शब्दांत उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी महिलांना आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
टाटा टी गोल्ड मिक्स्चर प्रस्तुत ‘लोकमत’ ‘ती’चा गणपती या उपक्रमांतर्गत सोमवारी सायंकाळी प्रोझोन मॉल येथे महिलांसाठी स्पर्धा परीक्षाविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रोझोन मॉल हे या उपक्रमाचे व्हेन्यू पार्टनर आहेत. यादरम्यान उपजिल्हाधिकारी धानोरकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मनातील स्पर्धा परीक्षाविषयक भीती दूर केली. एमपीएससी, यूपीएससी परीक्षा, अभ्यासक्रम, पूर्व व मुख्य परीक्षेसाठीची तयारी, मुलाखतीची तयारी याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
प्रशासकीय सेवेत काम करण्याची मनापासून इच्छा असेल तरच या मार्गाला या. सगळे करतात म्हणून उगाचच परीक्षा देत बसू नका, पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय परीक्षेला बसू नका, अशी विशेष माहितीही त्यांनी दिली.
कोणत्याही परीक्षांसाठी किती तास अभ्यास करावा, याचे कोणतेही नियम ठरलेले नाहीत. त्यामुळे स्वत:च्या क्षमतेनुसार अभ्यास करा. परीक्षेची तयारी ते यश अशा सगळ्याच प्रवासाचा आनंद लुटा, अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थिनींना यशाचा राजमार्ग दाखविला. याप्रसंगी राजेश पाटील आणि डिफेन्स करिअर अकॅडमी विद्यार्थिनींची विशेष उपस्थिती होती.
सोमवारी सायंकाळी के्रडाईच्या महिला विंगतर्फे ‘ती’च्या गणपतीची आरती करण्यात आली. याप्रसंगी नीता यादव, स्वप्ना बेदमुथा, परिणिता खैरनार, सविता आग्रहारकर, सुरेखा पाटील, अपर्णा अतकरे, हेमा सुखिया, दीपा पठारे, शिल्पा बगडिया, वंदना बगडिया, माधुरी घुटोले, स्नेहा गुप्ता, वैशाली मुनोत यांनी गणरायाची आरती केली.