यंदा बासमतीच्या आस्वादासाठी खिसा ठेवा गरम; भारतीय तांदळाची विदेशात मागणी वाढली

By प्रशांत तेलवाडकर | Published: January 25, 2023 08:19 PM2023-01-25T20:19:31+5:302023-01-25T20:20:41+5:30

पाकिस्तानात महापुराने मोठे नुकसान; भारत जगाला देतोय तांदूळ

Keep your pocket warm for Basmati this year; Demand for Indian rice abroad increased | यंदा बासमतीच्या आस्वादासाठी खिसा ठेवा गरम; भारतीय तांदळाची विदेशात मागणी वाढली

यंदा बासमतीच्या आस्वादासाठी खिसा ठेवा गरम; भारतीय तांदळाची विदेशात मागणी वाढली

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद :
मन तृप्त करणारा सुगंध आणि अवीट गोडीने बासमतीने संपूर्ण जगातील खवय्यांना वेड लावले आहे. मात्र, देशातील खवय्यांना या भाताची गोडी चाखण्यासाठी आपला खिसा गरम ठेवावा लागणार आहे. कारण, विदेशातील खवय्यांच्या जिभेचे ‘लाड’ पूर्ण करण्यासाठी यंदा मोठ्या प्रमाणात भारतीय बासमती निर्यात होत आहे.

बासमतीची किंमत कमी असल्याने पाकिस्तान या तांदळाची भारतापेक्षा जास्त निर्यात जगात करीत असतो. मात्र, पावसाळ्यात तिथे महापुराने थैमान घातले आणि तांदळाचे पीक नष्ट झाले. यामुळे आता विदेशातून विशेषत: आखाती देशातील गरजा पूर्ण करण्यासाठी तेथील सरकार भारताला साद घातली जात आहे. निर्यात वाढल्याने भारतात मागील महिन्याभरात बासमती तांदळाचे भाव तब्बल ४० टक्क्यांनी महागले आहे. ट्रेड प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाने (टीपीसीआय) दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबिया आणि येमेन या देशांत बासमती निर्यात होत आहे. इराणमध्ये भारतीय बासमतीची थेट निर्यात होत नसली तरी इराकमार्गे तेथे बासमती जात आहे. यामुळे ३० टक्क्यांनी मागणी वाढली आहे. यामुळे देशात बासमती व अन्य तांदळाचे भाव वधारले आहेत.

दोन हजारांनी महागला बासमती
बाजारात नवीन बासमती दाखल झाला आहे. मात्र, मागील महिन्यात होलसेल विक्रीत या बासमतीचे भाव क्विंटलमागे चक्क दोन हजार रुपयांनी कडाडले आहेत. डिसेंबरमध्ये ५,००० ते ८,००० रुपये क्विंटल विकणारा बासमती सध्या ७,००० ते १०,२०० रुपयांदरम्यान, तर तुकडा बासमती ४,००० ते ८,००० रुपये विक्री होत आहे. किरकोळ विक्रीत १५ रुपयांनी वाढ होऊन सध्या बासमती ६० ते १३० रुपये किलो विकत आहे. निर्यात वाढत राहिली तर आणखी भाववाढ होण्याची शक्यता होलसेल व्यापारी नीलेश सोमाणी यांनी वर्तविली आहे.

अन्य तांदळाचे भावही वाढले
बासमती महागल्याने अन्य तांदळाच्या किमतीतही क्विंटलमागे ४०० ते ८०० रुपयांपर्यंत भाववाढ झाली.
तांदळाचा प्रकार.....किंमत (क्विंटल)
सुगंधी चिन्नोर ३,८००-४,१०० रु.
कालीमुछ ४,५००-५,३०० रु.
कोलम ४,७००-५,१०० रु.
आंबेमोहर ६,८००-७,२०० रु.
स्टिम सोना ३,८००-४,२०० रु.
मिनी कोलम ४,५००-४,८०० रु.
इंद्रायणी ४,८००-५,००० रु.

Web Title: Keep your pocket warm for Basmati this year; Demand for Indian rice abroad increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.