शैक्षणिक चळवळ कायम तेवत राहावी- कुलगुरू
By Admin | Published: June 28, 2017 12:12 AM2017-06-28T00:12:48+5:302017-06-28T00:28:42+5:30
नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी ही ध्येयवादी संस्था असल्याचे प्रतिपादन स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी ही एक ध्येयवादी संस्था असून या संस्थेमध्ये मराठवाड्याच्या शैक्षणिक चळवळीचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर यांनी केले़
नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खा़ डॉ़ व्यंकटेश काब्दे तर सहसचिव अॅड़ चैतन्यबापू देशमुख, सदाशिवराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी अंजली कुलकर्णी हिने शारदास्तवन सादर केले़
शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था तसेच शिक्षकांनी वर्तमानकालीन आव्हानांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच समाजोपयोगी संशोधनावर भर दिला पाहिजे़ विद्यापीठाने सीबीसीएस पॅटर्न निर्माण करून नवीन आदर्श घडवून दिला आहे़ आज तो सर्व विद्यापीठांसाठी अनुकरणीय ठरला आहे़ पीपल्स व सायन्स कॉलेजने मराठवाड्यातील अन्य महाविद्यालयांना शैक्षणिक विकासाच्या वाटा दाखवाव्यात, असे कुलगुरू डॉ़ विद्यासागर म्हणाले़
अध्यक्षीय समारोपात डॉ़ व्यंकटेश काब्दे म्हणाले, संस्थेचा ६७ वा वर्धापन दिन होत असून संस्था ज्येष्ठ झाली आहे़ त्यामुळे संस्थेच्या विकासासाठी शासन व विद्यापीठाकडे विविध योजनांद्वारे अनुदान मागता येईल़ परंतु, त्याबरोबरच संस्था श्रेष्ठ होण्यासाठी शिक्षक, कर्मचारी व संस्थाचालकांनी एकत्रितपणे कठोर परिश्रम करण्याची गरज आहे़ प्रास्ताविकात संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला़ पीपल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ़ आऱ एम़ जाधव, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ़ डी़ यु़ गवई, पीपल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक अवधुत गिरी यांनी मनोगत व्यक्त केले़
सायन्स कॉलेजने नॅशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये देशात ७२ वा आणि महाराष्ट्रात सहावा तर मराठवाड्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल प्राचार्य डॉ़ डी़ यु़ गवई यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल राहुल गवारे, महेश डोंगरकर यांचाही सत्कार करण्यात आला़ सूत्रसंचालन डॉ़ अशोक सिद्धेवाड तर संस्थेचे सहसचिव अॅड़ चैतन्यबापू देशमुख यांनी आभार मानले़
माजी प्राचार्य देशपांडे, प्रा़ राजाराम वट्टमवार, इंजि़ द़ मा़ रेड्डी, सितारामजी जाजू यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते़