बायोमेट्रिकमुळे रॉकेलचा सुकाळ
By Admin | Published: August 3, 2014 12:55 AM2014-08-03T00:55:53+5:302014-08-03T01:11:33+5:30
औरंगाबाद : रेशनवरील धान्य आणि रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी वर्षभरापूर्वी लागू करण्यात आलेल्या बायोमेट्रिक पद्धतीचे फायदे दिसण्यास सुरुवात झाली आहे
औरंगाबाद : रेशनवरील धान्य आणि रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी वर्षभरापूर्वी लागू करण्यात आलेल्या बायोमेट्रिक पद्धतीचे फायदे दिसण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत रेशन दुकानदारांना वितरणासाठी दिलेले रॉकेल कधीही शिल्लक राहत नव्हते. मात्र, बायोमेट्रिक पद्धत लागू केलेल्या दुकानांवर आता ते शिल्लक राहत आहे. चालू महिन्यात १८ दुकानांवर २४०० लिटर रॉकेल शिल्लक राहिल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण १७७७ रेशन दुकाने आहेत. या दुकानांमधून रेशनकार्डधारकांना दरमहा अन्नधान्य आणि रॉकेलचा पुरवठा केला जातो. मात्र, अनेक लाभार्थी रेशनवरून अन्नधान्य किंवा रॉकेल घेऊन जात नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा रेशन दुकानांवर काही कोटा शिल्लक राहतो.
परंतु अनेक दुकानदार हा कोटा वितरित झाल्याचे दाखवून त्याची काळ्याबाजारात विक्री करतात. हा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वर्षभरात रेशन दुकानांसाठी प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक पद्धत लागू केली.
याअंतर्गत आतापर्यंत औरंगाबाद शहरातील ९ आणि फुलंब्रीतील ९, अशा १८ दुकानांवर बायोमेट्रिक यंत्रे बसविण्यात आली आहेत. रेशन दुकानदारांना टॅब्लेटचे वाटप करण्यात आले असून, त्यात लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती आणि त्यांच्या बोटांचे ठसे साठविण्यात आलेले आहेत. हे ठसे जुळल्यानंतरच त्या ठिकाणी धान्य दिले जाते.
हे टॅब्लेट आॅनलाईन पद्धतीने सर्व्हरशी जोडलेले आहेत. त्यामुळे कोणत्या दुकानावरून किती आणि कोणत्या लाभार्थ्यांना धान्य वाटप झाले याची प्रत्येक मिनिटाची माहिती वरिष्ठ पातळीवर समजते. त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, बायोमेट्रिक पद्धत लागू केलेल्या दुकानांवर दरमहा अन्नधान्य आणि रॉकेलचा काही कोटा शिल्लक राहत आहे. आतापर्यंत रॉकेलचा कोटा कधीही शिल्लक राहत नव्हता. मात्र, मागील महिन्यात १८ दुकानांवर तब्बल २४०० लिटर रॉकेल शिल्लक राहिले आहे.
गंगापूर तालुक्यातही लागू करणार
सध्या औरंगाबाद शहर आणि फुलंब्री तालुक्यातील १८ दुकानांवर प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक यंत्रे बसविण्यात आली आहेत.
त्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्यामुळे लवकरच गंगापूर तालुक्यातील ९ दुकानांवरही बायोमेट्रिक पद्धत लागू केली जाणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.