पारंपरिक आहारच खºया अर्थाने आरोग्याची गुरुकिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:24 AM2017-09-25T00:24:55+5:302017-09-25T00:24:55+5:30
आपला पारंपरिक आहारच खºया अर्थाने आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असा मोलाचा सल्ला आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांनी दिला.
औरंगाबाद : ‘उंच- सडपातळ बांधा’ यासारखी नफेखोर कंपन्यांनी निर्माण केलेली सौंदर्याची प्रतीके मनावर बिंबवून आपण आपल्या पारंपरिक आहारापासून दूर जात आहोत. तूप, मीठ, साखर, स्थानिक खाद्यपदार्थ टाळून आपण सलाद, किनोआ, सूप अशा विदेशी अन्नपदार्थांचे सेवन करीत आहोत. मात्र, आपल्या पूर्वजांच्या अफाट ज्ञानातून तयार झालेला आपला पारंपरिक आहारच खºया अर्थाने आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असा मोलाचा सल्ला आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांनी दिला.
‘वाईडर आॅपॉर्च्युनिटीज् फॉर वूमेन’ (वॉव) या संस्थेच्या वतीने रविवारी (दि.२४) प्रेसिडेंट लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ‘सखी मंच’च्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा आणि ‘वॉव’च्या संस्थापक अध्यक्षा रुचिरा दर्डा उपस्थित होत्या.
करिना कपूर व आलिया भटसह सिनेक्षेत्रातील अनेक आघाडीच्या सेलिब्रिटींच्या आहारतज्ज्ञ म्हणून ऋतुजा काम करतात.
भारतीय आहाराचे महत्त्व विशद करताना त्यांनी तुपाविषयीचे अनेक गैरसमज खोडून काढले. तुपाअभावी व्हिटॅमिन ‘डी’ कमी होते, ज्यामुळे भूक न लागणे, चीडचीड वाढणे, झोप न येणे, मासिक पाळी अनियमित होणे, थायरॉइडच्या समस्या, सततचे आजारपण, केस गळती अशा समस्या सुरू होतात. यावर उपाय म्हणजे रोजच्या जेवणात तूप असायलाच हवे, अशी माहिती त्यांनी दिली.
‘पूर्वी एखाद्या घराची श्रीमंती तेथील तूप आणि दुग्धजन्य पदार्थांवरून ठरविली जाई. मात्र, विदेशी अन्न कंपन्यांनी भारतीय खाद्यपदार्थांचे महत्त्व कमी केले; परंतु आता जगालादेखील भारतीय आहारशास्त्राचे महत्त्व कळाले आहे. आपली आजी हीच सर्वात हुशार ‘डाएटिशन’असते. तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका, असा संदेश दिवेकर यांनी दिला.