‘केजी टू पीजी’ प्रवेश प्रक्रियेचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 05:36 PM2019-08-31T17:36:34+5:302019-08-31T17:43:10+5:30
शालेय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपयश
- राम शिनगारे
औरंगाबाद : राज्य शासनातील शालेय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागातील समन्वयाचा अभाव, नियोजनातील त्रुटी आणि गटबाजीचा फटका ‘केजी टू पीजी’ प्रवेश प्रक्रियेला बसला. या अनागोंदीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. प्रवेश प्रक्रियेच्या धोरणातील त्रुटीमुळे विविध निर्णयांना सतत न्यायालयात आव्हान दिले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात पैशांचा अपव्यय होत आहे. केजीसह पहिली प्रवेशासाठी वयातील सततची धरसोडवृत्ती, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठीच्या आरटीईचे प्रवेश रखडलेले आहेत. अकरावी प्रवेशाचे तीनतेरा वाजले. तंत्रनिकेतन, आयटीआय, एमबीए, अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधि, बी.एड. अभ्यासक्रम, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय आणि विभागातील प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे. या गोंधळावर उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांसह मंत्र्यांचेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पहिली प्रवेशात वयाचा घोळ
राज्य शासनाने पहिलीतील प्रवेशासाठी सहा वर्षांचा नियम केला होता. पूर्वी हा नियम साडेपाच वर्षांचा होता. मात्र, या नियमामुळे अडचणी निर्माण होऊ लागल्यामुळे मुख्याध्यापकांना सहा वर्षांच्या वयामध्ये १५ दिवसांची सूट देण्याचे अधिकार शाळा भरल्यानंतर दोन महिन्यांनी देण्यात आले. तरीही वर्ष वाया जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारांमध्ये आहे.
अकरावी प्रवेशाचा गोंधळ मिटेना
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकच्या धर्तीवर औरंगाबाद महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेश आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. यात ११० महाविद्यालयांमध्ये विविध शाखांमध्ये २९ हजार १०० जागा उपलब्ध असताना प्रवेशासाठी अवघ्या १९ हजार ७३६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केलेली आहे. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये ११ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. १४ आॅगस्ट रोजी जाहीर केलेल्या विशेष फेरीत २ हजार ९४६ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली होती. त्यातील अवघ्या ६६१ विद्यार्थ्यांनी १६ आॅगस्टपर्यंत प्रवेश निश्चित केले होते. त्यामुळे १९ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली. तरीही प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले नसल्याची माहिती समोर आली आहे. या आॅनलाईन प्रवेशाचा गोंधळ तीन महिन्यांपासून सुरू आहे. अनेक महाविद्यालयांनी अद्यापही अध्यापनास सुरुवात केली नाही. अकरावी प्रवेशाचा गोंधळ ऑगस्ट महिना पूर्ण होईपर्यंत संपणार नाही. याचवेळी अकरावीतील रिक्त जागांची संख्या १६ हजारांपेक्षा अधिक असणार आहे.
औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश उपलब्ध
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या अभ्यासक्रमालाही शासन निर्णयाप्रमाणे २६ आॅगस्टपासून पुन्हा ३१ आॅगस्टपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहेत. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचीही हीच अवस्था निर्माण झाली आहे.
‘एमबीए’ प्रवेशाचे भवितव्य अद्यापही अधांतरीच
राज्य शासनाच्या सीईटी सेलमार्फत सुरुवातीला एमबीए प्रवेशासाठी ‘सार’ प्रणालीवर विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन अर्ज भरून घेण्यात आले होते. ही प्रक्रिया सुरू असतानाच सीईटी सेल आणि तंत्रशिक्षण विभागात कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्यामुळे ‘सार’वरची संपूर्ण नोंदणी रद्द करण्यात आली. यानंतर ३० जून पासून जून्या प्रक्रियेनेच नोंदणी सुरू केली. १७ जुलै रोजी पहिली फेरी जाहीर करण्यात आली. मात्र, मुंबईतील जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत प्रवेश प्रक्रिया थांबवली. यात संस्थेच्या बाजूने न्यायालयाने आदेश दिल्यामुळे पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया राबवावी लागली. याला विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने न्यायालयाने प्रक्रिया थांबवली आहे. यावर २८ आॅगस्ट रोजी सुनावणी झाली. त्यात अद्यापही निर्णय आलेला नाही. त्यामुळे प्रवेश अधांतरीच आहेत.
अभियांत्रिकीची प्रक्रिया पुन्हा नव्याने होणार
राज्यातील अभियांत्रिकी, आर्किटेक्चर महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया विविध अडथळ्यांची शर्यत पार करून १४ आॅगस्ट रोजी पूर्ण झाली होती. मात्र, राज्यातील महाविद्यालयांमध्ये हजारो जागा रिक्त राहिल्यामुळे आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यामुळे सीईटी सेलतर्फे २६ आॅगस्ट रोजी पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्याविषयी पत्र काढले आहे. यानुसार ३१ आॅगस्टपर्यंत पुन्हा प्रवेश देण्यात येणार आहेत. हीच परिस्थिती आर्किटेक्चर अभ्यासक्रमाबाबत निर्माण झाली आहे.
आयटीआय, तंत्रनिकेतन पूर्ण
आयटीआय, तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया गोंधळानंतर पूर्ण झाल्या आहेत. मात्र या प्रवेश प्रक्रियेकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या हजारो जागा रिक्त आहेत.
वैद्यकीयच्या प्रवेशातही अडचणींचा डोंगर
सर्वाधिक स्पर्धा असलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत अडचणींचे डोंगर निर्माण झालेले आहेत. मागील १५ दिवसांपासून ही प्रक्रिया ठप्प झालेली आहे. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २१ जूनला नोटिफिकेशन काढण्यात आले होते. यानंतर २२ ते २६ जूनदरम्यान आॅनलाईन नोंदणी करून घेतली. मात्र, दुसऱ्या फेरीनंतर अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या जात पडताळणी प्रमाणपत्रा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या फेरीनंतर अद्यापही पुढील प्रक्रिया थांबलेली आहे. यावर २८ आॅगस्ट रोजी सुनावणी होती. त्यात काय निर्णय दिला. याविषयी अद्याप काहीही अपडेट केलेले नाही. हीच अवस्था वैद्यकीयच्या बीएएमएस, बीएचएमएससह इतर आठ अभ्यासक्रमांची आहे. या अभ्यासक्रमांचीही एकच प्रवेश फेरी जाहीर झाली आहे. पुढील सर्व प्रक्रिया थांबलेली आहे.२८ जून ते ३ जुलैदरम्यान कागदपत्रांची तपासणी, २९ जून ते ४ जुलैदरम्यान पसंतीक्रम देण्याची मुदत होती. ५ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. मात्र, गोंधळामुळे जाहीर झाली नाही. पुन्हा ६ जुलै रोजी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यानंतर १२ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली. या वेळापत्रकानुसार १ आॅगस्ट रोजी पूर्ण प्रक्रिया संपवून तासिकांना सुरुवात करण्याचे नियोजन होते.
विद्यापीठातील प्रवेश रखडलेल्या स्थितीत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यापीठातर्फे प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेण्यात आली. यात काही विभागांचा अपवाद वगळता उर्वरित विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा कमी विद्यार्थ्यांनी सीईटीची परीक्षा दिली. याचवेळी संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना विनासीईटी प्रवेश दिल्यामुळे तेथील प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक झाले. मात्र, विद्यापीठातील अनेक विभागांना विद्यार्थीच मिळाले नाहीत. यामुळे वारंवार प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. नवनियुक्त कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पदभार घेतल्यानंतर ही अवस्था पाहून विनासीईटी प्रवेश देण्याचे आदेश दिले. तरीही अद्याप विभागांमधील जागा पूर्णपणे भरलेल्या नाहीत.