मुळ प्रतीत खाडाखोड; लाखोंचा अपहार !
By Admin | Published: May 31, 2016 12:04 AM2016-05-31T00:04:51+5:302016-05-31T00:09:16+5:30
बाळासाहेब जाधव ल्ल लातूर एसटी महामंडळाच्या त्रैमासिक पास योजनेत अंतर कमी दाखवून घोटाळा केल्याचे उघड झाले आहे़ यातून लातूरच्या एसटी महामंडळाला २ लाखांचा
बाळासाहेब जाधव ल्ल लातूर
एसटी महामंडळाच्या त्रैमासिक पास योजनेत अंतर कमी दाखवून घोटाळा केल्याचे उघड झाले आहे़ यातून लातूरच्या एसटी महामंडळाला २ लाखांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला असून यात आणखीन घोटाळा असल्याची शक्यता आहे़ त्या दृष्टीने प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे़ ज्या कर्मचाऱ्याने हा घोटाळा केला त्या कर्मचाऱ्याचा टेबल आता बदलण्यात आला असून, त्याच्यावर वाहतूक नियंत्रकाची जबाबदारी सोपविली आहे़
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर आगारा अंतर्गत निलंगा व उदगीर या ठिकाणीही त्रैमासिक पासमध्ये अपहार झाला होता़ संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती़ या घटनेला एक वर्ष उलटत नाही़ तोपर्यंत लातूर आगारात त्रैमासिक पासेस योजनेतून अपहार झाल्याचे उघड झाले आहे़ २ लाखांचा फटका महामंडळाला बसला आहे़ गेल्या तीन वर्षात १ ते दीड हजार त्रैमासिक पासेस देण्यात आले आहेत़ विशेष म्हणजे दिलेला पास लातूर ते निलंगा परंतू कार्यालयीन दप्तरात लातूर ते चांडेश्वर असा एकाच टप्प्याचा प्रवास दाखविण्यात आला आहे़ असे हजारो पासेस दिले आहेत़ यातून संबंधित कर्मचाऱ्याने लाखोंचा मलिदा लाटल्याचा ठपका आहे़ विभागीय वाहतूक अधिकारी व लातूर आगार प्रमुख यांनी पासेस दप्तराची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे़ संबंधित कर्मचाऱ्यांकडून पासेसचे दप्तरही ताब्यात घेतले आहे़
एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी शालेय विद्यार्थी पास, वार्षिक पास, त्रैमासिक पास या सवलतीच्या योजना सुरु केल्या आहेत़ आवडेल तेथे प्रवास ही योजनाही आहे़ २० दिवसाच्या पैशात ३० दिवस, ६० दिवसाच्या पैशात ९० दिवसांचा प्रवास तर २०० रुपयात वार्षिक प्रवास अशा या सवलतीच्या योजना आहेत़ त्यातील त्रैमासिक पास योजनेत २ लाखांचा घोटाळा झाल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी गौतम जगतकर, लातूर आगार प्रमुख धरणी कांडगीरे यांनी केलेल्या तपासणीत उघड झाले आहे़ वाहतूक नियंत्रक अजित बोयणे यांनी दिलेल्या पासमध्ये हा घोटाळा उघड झाल्याने अन्य २९ वाहतूक नियंत्रकांनी दिलेल्या पासची तपासणी केली जात असून, त्यासाठी पथक नियुक्त केले आहे़
चौकशीनंतर कारवाई : विभागीय वाहतूक अधिकारी़़़
याबाबत विभागीय वाहतूक अधिकारी गौतम जगतकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले़ त्रैमासिक पास काढण्यासाठी ३ प्रतीमध्ये पावती बनवावी लागते़ त्यामध्ये प्रवाशांना वेगळी ओसी दिली़ तर कार्यालयीन ओसीमध्येही बदल केल्याचे दिसून आले आहे़ प्रथमदर्शनी २ लाख रुपयांचा यात अपहार असावा़ आगार प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरु आहे़ चौकशीनंतर दोषीवर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले़