खोडवेकर यांची अखेर पुण्याला बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:01 AM2017-09-01T00:01:08+5:302017-09-01T00:01:08+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांची अखेर पुणे येथे महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्पाच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांची अखेर पुणे येथे महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्पाच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. आ.डॉ.राहुल पाटील, आ.बाबाजानी दुर्राणी यांनी खोडवेकर यांच्या निर्णयासंदर्भात विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहात लक्षवेधी, तारांकित प्रश्न, औचित्याचा मुद्दा आदींच्या माध्यमातून तक्रारी केल्या होत्या. आ.दुर्राणी यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांची चौकशी सुरु आहे. तर आ.डॉ.राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी खोडवेकर यांना त्यांची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविले जाईल, असे आश्वासन दिले होते. शासनाचा आदेश येण्याअगोदर १५ दिवसांपूर्वी खोडवेकर स्वत:च रजेवर गेले. त्यानंतर त्यांचा पदभार प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी जिल्हा परिषद प्रशासनास खोडवेकर यांच्या बदली संदर्भातील पत्र प्राप्त झाले. सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या या पत्रात खोडवेकर यांची पुणे येथे महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्प संचालकपदाच्या रिक्त जागेवर नियुक्ती केल्याचे नमूद करण्यात आले आहे. खोडवेकर यांनी त्यांचा कार्यभार औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाºयांकडे सोपवून नवीन पदभार त्वरित स्वीकारावा, असे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे खोडवेकर यांना एकतर्फीच कार्यमुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, खोडवेकर यांच्या बदलीचे वृत्त गुरुवारी सायंकाळी येताच विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. कर्मचारी संघटनेच्या काही प्रमुख पदाधिकाºयांच्या खोडवेकर यांनी परभणीतून इतर तालुक्याच्या ठिकाणी बदल्या केल्या होत्या. शिवाय पदाधिकारी व अनेक कर्मचाºयांनीही त्यांच्या कामकाजासंदर्भात तक्रारी केल्या होत्या.