खैरेंचा पराभव शिवसेनेच्या आमदारांमुळे झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:54 PM2019-06-02T23:54:17+5:302019-06-02T23:54:59+5:30
औरंगाबाद : शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव भाजपने केला नसून शिवसेनेच्याच आमदारांनी केला आहे. शिवसेनेकडून आमदार राहिलेले हर्षवर्धन ...
औरंगाबाद : शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव भाजपने केला नसून शिवसेनेच्याच आमदारांनी केला आहे. शिवसेनेकडून आमदार राहिलेले हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचा पराभव केला आहे. त्यामुळे त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिले. खा.खैरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व शहरातील भाजप नगरसेवक, पदाधिकाऱ्यांवर अपक्ष उमेदवार जाधव यांचे काम केल्याचा आरोप केला होता. त्यावर आज महसूलमंत्र्यांनी स्पष्टीकरण देत जाधव हे शिवसेनेचे आमदार होते, त्यांच्यामुळेच खैरेंचा पराभव झाल्याचे स्पष्ट केले.
मराठवाड्यातील दुष्काळी भागातील कामांचा आढावा घेण्यासाठी ते रविवारी औरंगाबादेत आले होते. सकाळी विभागीय आयुक्तालयात व दुपारी आयएमए हॉलमधील चर्चासत्राला त्यांनी हजेरी लावली. आयएमए हॉलमधील चर्चासत्रानंतर महसूलमंत्री पाटील पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले, आगामी विधानसभेसाठी भाजप-शिवसेना यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. भाजप १३५ व शिवसेना १३५ जागांवर लढेल. विधानसभा निवडणुकीच्या युतीबाबत पाटील म्हणाले, भाजप-शिवसेना विधानसभेत युती करूनच लढेल. त्यात कोणताही बदल होणार नाही. २८८ पैकी २७० जागांवर युती लढेल. १८ जागा या युतीसोबत असलेल्या मित्रपक्षांना सोडण्यात येतील.
जागा वाटपात बदल नाही
पूर्वी ठरल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी १३५ जागांवर आपले उमेदवार उभे करील. तेवढ्याच जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढतील. त्यामुळे युतीच्या या जागा वाटपात काही बदल होणार नाहीत. एकत्रितपणे विधानसभेलाही शिवसेना-भाजप व मित्रपक्ष सामोरे जातील, असा दावा पाटील यांनी केला.
-------------