खाकी वर्दीतला ‘मोहम्मद रफी!, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांच्या गायकीला सलाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:22 AM2018-12-03T04:22:13+5:302018-12-03T04:23:21+5:30
खाकी वर्दीतील मोठ्या पदाची जबाबदारी पेलतानाच कधी मोहम्मद रफी, तर कधी कुमार सानू ते गातात.
- खुशालचंद बाहेती
औरंगाबाद : खाकी वर्दीतील मोठ्या पदाची जबाबदारी पेलतानाच कधी मोहम्मद रफी, तर कधी कुमार सानू ते गातात. पहिल्याच परफॉर्मन्सला बक्षिसी मिळाली, तीही पार्श्वगायक महेंद्र कपूर यांच्या हस्ते. डॉ. शिवाजी राठोड त्यांचे नाव. पोलीस अधीक्षक म्हणून जेवढा दरारा, तेवढीच उत्तम गायक म्हणूनही ओळख.
पाथर्डी (जि. नगर) येथील डॉ. शिवाजी राठोड मुंबईच्या पशुवैद्यक महाविद्यालयात १९८८ साली असतानाची गोष्ट. महाविद्यालयाच्या म्युझिक रूममध्ये काही मित्र जमले होते. प्रत्येकाने एक गाणे गावे हा खेळ सुरू झाला. शिवाजी यांनी मोहम्मद रफींचे गाणे गायले. सर्वच मित्रांनी दाद दिली आणि प्रॅक्टिस कर असा सल्लाही दिला. काही दिवसांच्या पॅ्रक्टिसनंतर आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत मुंबईच्या रुईया महाविद्यालयात त्यांना पहिल्यांदा स्टेज परफॉर्मन्सची संधी मिळाली. समोर मोठा महाविद्यालयीन जमाव होता. त्यामुळे तो तेवढाच खोडकर होता आणि या स्पर्धेचे पर्यवेक्षक होते साक्षात पार्श्वगायक महेंद्र कपूर. शिवाजी राठोड यांनी भीतभीत मोहम्मद रफींचे गाणे सुरू केले. आवाज चढवला आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. गाणे संपताच प्रचंड टाळ्यांची दाद मिळाली आणि पहिल्याच परफॉर्मन्सला महेंद्र कपूर यांनी तिसऱ्या बक्षिसासाठी निवड केली. ही कौतुकाची थाप त्यांना गाण्याच्या आणखी जवळ घेऊन गेली. नंतरच्या वर्षी नायर कॉलेजमध्ये झालेल्या स्पर्धेत पंकज उधास परीक्षक होते. तेथेही बक्षीस मिळाले. यानंतर त्यांनी अनेक बक्षिसे मिळवली. व्यावसायिक आॅर्केस्ट्रॉतही ते गाऊ लागले. संगीताचा कोणताही कौटुंबिक वारसा नाही. शास्त्रीय संगीताचे कुठले शिक्षण नाही. एकलव्याप्रमाणे स्वत:च स्वत:चे गुरू होऊन त्यांनी गाण्यात प्रावीण्य मिळविले. १९९६ मध्ये पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर यात काही काळ खंड पडला. नोकरीतील तणाव घालविण्यासाठी ते पुन्हा गाण्याकडे वळले. रियाजला वेळ मिळत नाही; पण शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी २ ते ३ तास ते न चुकता रियाज करतात. कधी मोहम्मद रफी, तर कधी कुमार सानू यांची गाणी गातात. मराठी भावगीतेही त्यांना गायला आवडतात. पोलिसांचे मेळावे, राज्य क्रीडा स्पर्धांतून ते गाणी सादर करतात.
सध्या त्यांच्यावर ठाणे पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी आहे. रियाज करायला नियमित वेळ मिळत नाही; तरीही शक्य होईल तेव्हा त्यांचा रियाज सुरू होतो. त्यामुळे कामाचा ताण घालविण्यासही मदत होते.
>लवकरच अल्बम
हा गायक पोलीस अधीक्षक आहे, हे लोकांना सांगूनही त्यावर विश्वास बसत नाही. त्यांच्या मुली वैष्णवी आणि आर्याही गातात. राठोड यांच्या गाण्यांना यू-ट्यूबवर खूप हिटस् आहेत. येत्या काळात स्वत:च्या गाण्यांचा अल्बम काढण्याचा त्यांचा विचार आहे. यात कदाचित त्यांच्या मुलीही सहभागी होतील. अल्बम व्यावसायिक नसेल; पण स्वत:साठी व राज्यातील पोलिसांसाठी असेल, असे ते सांगतात.