खाकी गणवेश, परवाना अन् बिल्ला पाहिजेच; रिक्षाचालकांना पोलिसांचा तीन दिवसांचा अल्टीमेटम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 05:19 PM2024-09-10T17:19:56+5:302024-09-10T17:20:25+5:30

सहायक आयुक्तांनी बैठक घेऊन दिली तंबी

Khaki uniform, license and badge required; Three-day ultimatum from the police to the rickshaw pullers | खाकी गणवेश, परवाना अन् बिल्ला पाहिजेच; रिक्षाचालकांना पोलिसांचा तीन दिवसांचा अल्टीमेटम

खाकी गणवेश, परवाना अन् बिल्ला पाहिजेच; रिक्षाचालकांना पोलिसांचा तीन दिवसांचा अल्टीमेटम

छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक रिक्षाचालक खाकी गणवेशात दिसलाच पाहिजे. सोबत रिक्षाचे कागदपत्रे, चालक परवाना व छातीवर बिल्ला असला पाहिजे. तीन दिवसांचा अल्टीमेटम देतो, त्यानंतर कठोर कारवाईची मोहीम सुरू केली जाईल, बेशिस्तपणा सहन केला जाणार नाही, अशी तंबीच वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील यांनी दिली.

सोमवारी दुपारी वाहतूक शाखेच्या कार्यालयात शहरातील रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पाटील यांनी बैठक बोलावली होती. गेल्या अनेक दिवसांपासून बेशिस्त, गुंड प्रवत्तीच्या रिक्षाचालकांमुळे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. गणवेश नसणे, मूळ मालकाऐवजी चौथीच व्यक्ती रिक्षा चालवते, नादुरुस्त रिक्षातून प्रवाशांची वाहतूक, गाणे वाजवत सुसाट हुल देत जाण्याचे प्रकार वाढले आहेत. याची दखल घेत पाटील यांनी तुम्हाला नियम पाळावे लागतील, अशी तंबी देत कठोर कारवाईचा इशारा दिला. यावेळी निरीक्षक अमोल देवकर, राजेश मयेकर, सचिन इंगोले, विवेक जाधव यांची उपस्थिती होती.

परवानाधारकानेच रिक्षा चालवावी
सध्या रिक्षा विकत घेतल्यानंतर ती पुढे कमिशनवर इतरांना चालवण्यासाठी दिली जाते. असे दोन, तीन चालक बदलले जातात. यात त्यांची पार्श्वभूमी, गुन्हेगारी वृत्ती तपासली जात नाही. परिणामी, अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार, नशेखोर, अंमली पदार्थांचे तस्कर रिक्षा व्यवसायात उतरले. अल्पवयीन विद्यार्थ्यांची छेड काढणारा रिक्षाचालक देखील गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता परवानाधारकानेच रिक्षा चालवायची, चालक दुसरा आढळल्यास रिक्षा जप्त केली जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

हे नियम पाळा, अन्यथा कारवाई अटळ
- प्रवाशांना हात पकडून बसण्यासाठी हट्ट करायचा नाही.
- महिला, तरुणी दिसल्यावर गाणे, अश्लील इशारे करताना आढळल्यास थेट विनयभंगाचा गुन्हा.
- रिक्षाची उजवी बाजू बंद ठेवावी.
- रस्त्याच्या मध्येच रिक्षा उभी करू नये. सुरक्षित ठिकाणी प्रवाशांची चढ-उतार करावी.
- पाठीमागे प्रवासी बसवू नये. ते कायमचे बंद करा.
- नंबरप्लेट, बिल्ला क्रमांकात खाडाखाेड करू नका.

आरटीओ, मनपासोबत बैठक
बैठकीत रिक्षाचालकांनी पार्किंग व निश्चित दराविषयी समस्या मांडली. त्यावर आरटीओ व मनपाची लवकरच संयुक्त बैठक आयोजित करून अडचणी सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले.

Web Title: Khaki uniform, license and badge required; Three-day ultimatum from the police to the rickshaw pullers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.