तृतीयपंथियांनाही खाकी वर्दीचा रुबाब! मराठवाड्यातून पोलिस भरतीसाठी नांदेडमध्ये पहिला अर्ज दाखल
By प्रसाद आर्वीकर | Published: December 16, 2022 04:12 PM2022-12-16T16:12:14+5:302022-12-16T16:13:41+5:30
बहिष्कृत असलेल्या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने पोलिस भरती प्रक्रियेत तृतीयपंथियांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नांदेड : न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने सुरु केलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत तृतीयपंथियांनाही अर्ज करण्याची सुविधा केली असून, लवकरच खाकी वर्दीत तृतीपंथिय दिसणार आहेत. मराठवाड्यात सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यात तृतीयपंथी गटातून एक अर्ज पोलिस भरतीसाठी दाखल झाला आहे.
बहिष्कृत असलेल्या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने पोलिस भरती प्रक्रियेत तृतीयपंथियांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात ऑनलाईन अर्ज करताना त्यात ‘तृतीयपंथी’असा पर्यायही समाविष्ट करण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयाची माहिती येथील उच्चशिक्षित दिनेश हणवंते याला मिळाली. देशसेवा करण्याची आवड त्याच्या मनातपूर्वीपासूनच आहे. मात्र तृतीयपंथीचे प्रमाणपत्र नसल्याने त्याने अर्ज भरण्याचे सुरुवातीला टाळले होते.
मात्र पोलिस दलात दाखल होण्याची जिद्द असल्याने तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या कमल फाऊंडेशनने त्याला अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. तसेच त्याच्याकडून अर्ज भरुन घेतला. पोलिस भरतीसाठी तृतीयपंथी गटातून मराठवाड्यातील हा पहिलाच अर्ज असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
स्पर्धा परीक्षेची करतोय तयारी
दिनेश हणवंते हा उच्च शिक्षित असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा तो देत आहे. पोलिस भरतीसाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती मिळताच त्याने तृतीयपंथी गटातून अर्ज दाखल केला.