बिबट्याच्या धास्तीने खलंग्रीत जागरण
By Admin | Published: May 29, 2017 12:22 AM2017-05-29T00:22:59+5:302017-05-29T00:25:08+5:30
रेणापूर : तालुक्यातील खलंग्री येथे पुन्हा बिबट्या आल्याचे एका महिलेने शनिवारी मध्यरात्री पाहिले त्यामुळे परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
रेणापूर : तालुक्यातील खलंग्री येथे पुन्हा बिबट्या आल्याचे एका महिलेने शनिवारी मध्यरात्री पाहिले त्यामुळे परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे़ परिणामी, नागरिक गावाबाहेर पडण्यास तर शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नाहीत़
तालुक्यातील खलंग्री शिवारातील गजानन बोळंगे, अंकुश वाघमारे, गंगाधर कुसंगे यांच्या शेतात १६ मे रोजी बिबट्या फिरत असल्याचे दिसून आले होते़ त्यामुळे नागरिकांनी त्याची माहिती वनविभागास दिली होती़ दरम्यान, बिबट्याने शेतमजूर देवीदास चिकटे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता़ या बिबट्याचा खलंग्रीसह इनामवाडी परिसरात चार दिवस वावर सुरू होता़ या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने दोन पिंजरे लावले होते़ परंतु, बिबट्या सापडला नाही़ अंबाजोगाईकडे तो गेल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ठसे आढळले होते़ त्यामुळे खलंग्री व इनामवाडी येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता़
खलंग्री गावाशेजारी राहत असलेले नामदेव नागरगोजे यांच्या घराशेजारील जनावरे शनिवारी मध्यरात्री १़३० वाजण्याच्या सुमारास ओरडू लागली तर कुत्रे भुंकू लागली़ त्यामुळे नामदेव नागरगोजे व त्यांच्या पत्नी जाग्या झाल्या़ तेव्हा त्यांच्या घराच्या शेजारी बिबट्या येत असल्याचे पाहून त्यांनी आरडाओरड केली़ त्यामुळे बिबट्या गावाच्या दिशेने गेल्याचे नागरगोजे यांनी सांगितले़ त्यामुळे खलंग्री व गाव परिसरात मध्यरात्रीपासून पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे़ शेतमजूर शेतात काम करण्यासाठी धजावत नाहीत़ दरम्यान, खलंग्रीचे उपसरपंच गजानन बोळंगे यांनी माकेगाव येथील वनपाल केंद्रास माहिती दिली़ तेथील कर्मचाऱ्यांनी येऊन घटनास्थळाची पाहणी केली़