खाम नदीला मिळणारे सर्व नाले स्वच्छ करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:04 AM2021-03-06T04:04:51+5:302021-03-06T04:04:51+5:30
औरंगाबाद : महापालिकेने माझी वसुंधरा अभियानांतर्गत खाम नदी पुनरुज्जीवन मोहीम हाती घेतली आहे. लोकसहभागातून ही मोहीम राबवली जात आहे. ...
औरंगाबाद : महापालिकेने माझी वसुंधरा अभियानांतर्गत खाम नदी पुनरुज्जीवन मोहीम हाती घेतली आहे. लोकसहभागातून ही मोहीम राबवली जात आहे. पावसाळ्यापूर्वी खाम नदीला मिळणारे सर्व नाले स्वच्छ करण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्याचे आदेश पालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी प्रशासनाला दिले.
छावणी परिसरालगत असलेल्या खाम नदीच्या लोखंडी पुलाजवळील भागापासून पालिका आयुक्त पाण्डेय यांच्या पुढाकाराने खाम नदीची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. महिनाभरापासून दर शनिवारी लोकसहभागातून नदीपात्रातील कचरा उचलला जात असून, वृक्षांची लागवड केली जात आहे. आतापर्यंत पात्राच्या दोन्ही बाजूने दोन हजार रोपांची लागवड केली असून, तीन टन कचरा उचलण्यात आला आहे. खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पात पालिकेसोबतच स्मार्ट सिटीची टीम, इको सत्व, व्हेरॉकसह विविध संस्था, संघटना व नागरिक सहभागी झाले आहेत. दर शनिवारी नदीतील कचरा आणि घाण काढून नदी स्वच्छ केली जात आहे. या नदीला शहरातील छोटे-मोठे नाले येऊन मिळतात. त्यातील घाण नदीत येऊन खाम नदी प्रदूषित होते. याला प्रतिबंध करण्यासाठी खाम नदीला मिळणारे सर्व नाले पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करावे, त्यासाठी लागणारे कर्मचारी, यंत्रणा तातडीने उभी करून कामाला सुरुवात करण्याचे आदेश पाण्डेय यांनी पाहणीदरम्यान अधिकार्यांना दिले. यावेळी स्मार्ट सिटीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कळ शिवम, पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, ‘इको सत्व’च्या नताशा झरीन, उपअभियंता यांत्रिकी डी. के. पंडित, जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार आदी उपस्थित होते.