रिमझिम पावसावरच खरिपाची पेरणी; कपाशीची सर्वाधिक लागवड
By साहेबराव हिवराळे | Published: July 15, 2023 07:18 PM2023-07-15T19:18:00+5:302023-07-15T19:18:17+5:30
एकही मोठा पाऊस झालेला नसल्याने जलसाठे कोरडेच आहेत.
- श्रीकांत पोफळे
करमाड :औरंगाबाद तालुक्यात खरीप लागवड ६३ टक्के पूर्ण झाली असून, अद्याप देखील मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जवळपास वीस दिवस पावसाचे आगमन उशिरा झाल्यानंतर पेरणीयोग्य व खरिपाची पिके जिवंत राहतील, इतकाच अधूनमधून रिमझिम पाऊस होत असल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे.
तालुक्यातील एकूण खरीप हंगामाचे पेरणीयोग्य क्षेत्र ८४७५९ हेक्टर आहे. त्यापैकी ५४११२.८ हेक्टर म्हणजे ६३ टक्के पेरणी पूर्ण झाली असून, कपाशीची सर्वाधिक ३७ हजार ३३२ हेक्टरवर लागवड करण्यात आलेली आहे. त्यापाठोपाठ ७५९४ हेक्टर मक्याची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात कडधान्याची एकूण पेरणी ५४४१.८ हेक्टर झाली असून, त्यातील ५२९७ क्षेत्रावर तुरीची पेरणी करण्यात आली आहे. तर मूग ७३, उडीद ४५.८ तर इतर कडधान्यांची २७ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. तेलबियांपैकी सोयाबीन १०३८ हेक्टर सूर्यफुलाची ४ व इतर १३ हेक्टरवर मिळून १०५५ हेक्टरवर तेल बियाणांची लागवड करण्यात आली आहे. पावसाळी बाजरीची देखील २६०१ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.
...तरीही पीकस्थिती बरी
यावर्षी लागवडीला उशीर झाल्यानंतर पेरणी केलेल्या पिकांना आवश्यकतेनुसार अधूनमधून रिमझिम पाऊस होत असल्याने सध्या पिकांची परिस्थिती चांगली आहे. मात्र, एकही मोठा पाऊस झालेला नसल्याने जलसाठे कोरडेच आहेत. सतत काही दिवस पावसाने खंड दिल्यानंतर पिकांना देण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने कोरडवाहू क्षेत्र असलेले शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.