स्कूटरमध्ये अडकलेल्या खारुताईच्या तीन पिल्लांना दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:04 AM2021-06-26T04:04:57+5:302021-06-26T04:04:57+5:30
साहेबराव हिवराळे औरंगाबाद : लाॅकडाऊनमध्ये दोन महिने उभा राहिलेल्या स्कूटरमध्ये खारुताईनं तीन पिल्लांना जन्म दिला, परंतु अनभिज्ञ असलेल्या दुचाकीस्वाराने ...
साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : लाॅकडाऊनमध्ये दोन महिने उभा राहिलेल्या स्कूटरमध्ये खारुताईनं तीन पिल्लांना जन्म दिला, परंतु अनभिज्ञ असलेल्या दुचाकीस्वाराने गाडीत विचित्र आवाज येत असल्याने गॅरेजला सर्व्हिसिंगसाठी लावली. त्यात अडकलेली खारीची तीन पिल्लं सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिले.
लाॅकडाऊन काळात जवळपास दोन महिने कांचनवाडी नाथ व्हॅली स्कूलच्या पाठीमागे राहणारे सरबजीत चौधरी हे गावी गेले होते. इमारतीखाली स्कूटर एका जागी उभा होती.
अनलॉकनंतर ते गावाहून परतले अन् स्कूटरची धूळ साफ करून त्यावर बसून शहरभर सोमवारी फिरले, परंतु गाडी चालविताना खडखड आणि विचित्र आवाज येऊ लागल्याने दुसऱ्या दिवशी मंगळवारी सर्व्हिसिंगसाठी विजयनगरजवळ गॅरेजवर आणली. त्यावेळी गाडीत सापाच्या फुत्करल्याचा आणि चिवचिवाट खडखड आवाज होत असल्याचे सांगितले. साप असल्याची भीती लक्षात घेऊन गाडीचे मडगार्ड खोलण्याच्या आधी मेकॅनिकने सर्पमित्रांशी संपर्क साधला. जेणेकरून साप निघाल्यावर धावपळ व्हायला नको; मात्र मडगार्ड काढल्यावर गवत व इतर वस्तू साठविल्याचे दिसले. त्यात काहीतरी असावे अशी शंका आली त्यावेळी खारुताईची तीन पिल्लं स्कूटरच्या मोकळ्या जागेत स्वत:ला वाचविण्यासाठी धडपड करू लागली. हे चित्र पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला. ती पिल्लं वन्यप्रेमीने सुरक्षितरीत्या बाहेर काढले. दोन दिवसांपासून भुकेलेल्या त्या पिल्लांना चारा पाणी दिल्याने ते धोका विसरून सफरचंद खाण्यात गुंतले.
भीती वाटली म्हणून बोलविले...
गॅरेजवरील मेकॅनिक अनिल राऊत यांनी गाडी दुरुस्तीसाठी हाती घेतली. परंतु गाडी चालकाने सांगितलेल्या वर्णनामुळे गाडी खोलण्याची हिमत झाली नाही. त्यामुळेच वन्यप्रेमी व सर्पमित्र बोलाविले होते.
मडगार्ड काढल्यानंतरच कळले
गाडीमध्ये खारुताईने मोठा खोपा तयार केलेला होता आणि त्यात तीन पिल्लाला जन्म दिला होता. गाडीच्या आदळापटीने खोपा हलला आणि पिल्लं घाबरून जीव वाचविण्यासाठी पळत असल्याने विचित्र आवाज येत असल्याचे स्पष्ट झाले. दक्षता घेतली नसती तर मुक्या जीवाचा घात झाला असता अशी भावना वाहन चालकाने तसेच गॅरेज चालकासह उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
त्यांच्या अधिवासात सोडणार....
डॉ.किशोर पाठक यांना त्या तीनही पिल्लांना उपचारासाठी दाखविले होते. त्या खारुताईच्या पिल्लांचा ज्या ठिकाणी जन्म झाला, त्या ठिकाणी आठवडाभरात नेऊन सोडणार आहोत. ते निसर्गरम्य वातावरणात ते पुन्हा आनंदाने बागडतील,असे वन्यप्रेमी मनोज गायकवाड यांनी सांगितले.
(फोटो आहेत)