खाकीतील असंतोष

By Admin | Published: March 18, 2016 12:58 AM2016-03-18T00:58:57+5:302016-03-18T01:58:42+5:30

संजय तिपाले , बीड ‘मंै भी यहॉँ अँग्री यंग मॅन बनकर आया था... दो दिन में मुझे गांधीजी का बंदर बना दिया इन सिनीअर लोगोंने... ना देखो, ना बोलो, ना सुनो.

Khatki dissatisfaction | खाकीतील असंतोष

खाकीतील असंतोष

googlenewsNext


संजय तिपाले , बीड
‘मंै भी यहॉँ अँग्री यंग मॅन बनकर आया था... दो दिन में मुझे गांधीजी का बंदर बना दिया इन सिनीअर लोगोंने... ना देखो, ना बोलो, ना सुनो... कोई साथ नही देगा आपका’ हा ‘सिंघम’ चित्रपटातील ‘डायलॉग’ व्यवस्थेतील वास्तव अधोरेखित करतो. ‘बॉसगिरी’त पोलीस कर्मचारी पावलोपावली कसे भरडले जातात? याचा प्रत्यय अंबाजोगाईतील पोलीस कर्मचारी संतोष चाटे यांच्या आत्महत्येने पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. खाकीचे सुरक्षाकवच असताना अस्वस्थता व असुरक्षिततेची भावना जगणेच नाकारायला सांगते त्यावरुन ही घुसमट काळजात किती खोलवर घाव करतेयं याची प्रचिती आली. गुरुवारी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून खाकी वर्दीआड कर्मचारी भोगत असलेल्या वेदना समोर आल्या, त्या अशा...
सर्वांच्या सुरक्षेचा भार स्वत:च्या खांद्यावरुन वाहणाऱ्या पोलिसांच्या वाट्याला कायम उपेक्षाच येते. पोलिसांची ना संघटना आहे ना त्यांना सरकारविरोधात बोलण्याचा अधिकार! कायद्याच्या बेड्यांची सल आरोपींना कमी; पण कायद्याच्या रखवालदारांनाच अधिक आहे. त्यात ‘बॉस इज आॅलवेज राईट’ या अलिखित नियमांचे वार झेलत कर्तव्यपूर्ती करावी लागते.
पोलिसांनी साधी ट्रिपलसीट गाडी अडवली तरीही चार पुढाऱ्यांचे फोन, वरिष्ठांकडून खडेबोल असा तोंड दाबून बुक्क्यांचा मार हे पोलीस सहन करत असतात. कायद्याची अंमलबजावणी करताना खादीपुढे खाकीला बरेचदा माघार घ्यावी लागते, त्यामुळे पोलिसांचा नुसता वचक कमी झाला नाही तर चारचौघांत अपमानाचे बोलही ऐकावे लागतात.
पोलीस नाईक संतोष चाटे प्रकरणाने पोेलिसांच्या अस्वस्थेला पुन्हा वाचा फुटली आहे. मात्र, यातून शासन, प्रशासन व समाज काही धडा घेईल का? हा कळीचा प्रश्न आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे कामकाजातील निर्णय बदलावा लागतो का? या प्रश्नावर ३६ टक्के कर्मचाऱ्यांनी हो असे उत्तर दिले. ५४ टक्के कर्मचाऱ्यांना निर्णय बदलण्यासाठी वरिष्ठांच्या दबावाला सामोरे जावे लागत नाही. १० टक्के कर्मचाऱ्यांना याचा वाईट अनुभव कधीकधीच आला आहे.
कामकाजातील ताणतणावाचे परिणाम कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांनाही भोगावे लागतात का? यावर ६४ टक्के कर्मचाऱ्यांनी होकार दर्शविला. कौटुंबिक वातावरणावर परिणाम होत नाही असे म्हणणारे कर्मचारी केवळ १४ टक्के आहेत. कधीकधीच कुटुंबालाही ताण सहन करावा लागतो असे २२ जणांना वाटते.
एका कर्मचाऱ्याने सांगितले, नातेवाईकांच्या लग्नकार्य, अंत्यविधीलाही उपस्थित राहता येत नाही. पोलीस म्हणून काम करताना कधी-कधी अपमानास्पद प्रसंग वाट्याला येतात. त्यामुळे भरती होऊन घोडचूक केली, असेही वाटायला लागते.
एका महिला कर्मचाऱ्याने म्हटले की, वरिष्ठाच्या आदेशाचे पालन करत कर्मचाऱ्यांनी काम करायचे अन् काही बाबी अंगलट आल्यावर वरिष्ठांनी हात झटकायचे असे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिकार असून त्याचा वापर करता येत नाही.
पोलीस खात्यात खूप उन्हाळे- पावसाळे पाहिले. आता स्वेच्छा नोकरी घ्यावी वाटते. मला आठवते मी भाड्याच्या घरात रहायचो. पत्नी व दोन मुले घरी होती, मी गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तावर होतो. चोरांनी मध्यरात्री घरात हात साफ केला. लोकांची काळजी करताना कुटुंबासोबत जगायचे राहून गेले असे म्हणत त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.
पोलिसांच्या न्यायहक्कासाठी लढा
पोलीस कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून लढा देणार असल्याचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी सांगितले. स्वत:चे कुटुंब वाऱ्यावर सोडून इतरांची काळजी करणाऱ्या पोलिसांबाबत संवेदनशीलता दाखवावी, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Khatki dissatisfaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.