खिचडीचा रेकॉर्ड! २२ वस्तू, ६५०० किलोंची खिचडी अन् १४ हजार लोकांचे जेवण
By राम शिनगारे | Published: December 14, 2023 08:11 PM2023-12-14T20:11:40+5:302023-12-14T20:12:52+5:30
एशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद : एमजीएमच्या विद्यार्थी आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम
छत्रपती संभाजीनगर : गुरुवारी पहाटे पाच वाजेपासूनच ६५०० किलोंची खिचडी बनविण्याची लगबग सुरू झाली. प्रत्यक्ष ६ वाजता ६५०० किलो वजनाच्या २२ वस्तू १० बाय १० फूट आकाराच्या कढईमध्ये टाकण्यात आल्या. तब्बल तीन तास ५ क्विंटलपेक्षा अधिक लाकडाच्या ऊर्जेतून संपूर्ण मैदानावर खिचडी तयार झाली. संपूर्ण परिसरात खिचडीतील जिन्नसांचा दरवळ पसरला होता. हा आगळावेगळ्या उपक्रमाला एमजीएम विद्यापीठातील हॉटेल मॅनेजमेंट अन् नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास नेले गेले. स्वादिष्ट खिचडीचा एमजीएम विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह शहरातील १४ हजार नागरिकांनी आस्वाद घेतला. या अभिनव उपक्रमाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे.
एमजीएम विद्यापीठातील हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेफ विष्णू मनोहर यांच्या सहकार्याने हा उपक्रम गुरुवारी सकाळी केला. त्यासाठीची तयारी मागील काही दिवसांपासून सुरू होती. खिचडी बनविल्यानंतर एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या न्याय निर्णय प्रमुख रेखा सिंग यांनी खिचडी बनविण्याचा विश्वविक्रम बनविल्याचा प्रमाणपत्र महाविद्यालयाला प्रदान केले. यावेळी विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, अनुराधा कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. हरिरंग शिंदे, डॉ. विजया देशमुख, डॉ. रेखा शेळके, आयएचएमचे संचालक डॉ. कपिलेश मंगल यांची उपस्थिती होती.
एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या रेखा सिंग म्हणाल्या, ६५०० किलोंची खिचडी तयार करण्याचा हा उपक्रम जगातील एकमेव आहे. विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शेफ विष्णू मनोहर यांच्यातील कौशल्य पाहण्यासारखे आहे. यापुढे खिचडीची ओळख राष्ट्रीय डीश म्हणून होईल, असेही त्यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. पुष्पा गोरे, डॉ. वैभव जोशी, डॉ. रूपेश भावसार, डॉ. सिंधू सांगुडे, अमित पवार, बिदिशा रॉय, प्रवीण मुचक, गौरख औताडे यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची लेले व वैष्णवी पाटील यांनी, तर आभार डॉ. कपिलेश मंगल यांनी मानले.