खैरे यांचे चुकले; परंतु ते वक्तव्य भावनेच्या भरात केलेले : संजय राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 07:51 PM2020-03-17T19:51:12+5:302020-03-17T19:52:56+5:30
उमेदवारी न मिळाल्याने खैरेंनी केलेले वक्तव्य चुकीचेच
औरंगाबाद : राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलेले वक्तव्य चुकीचेच होते, असे मत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सोमवारी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
खैरे यांचे चुकले; परंतु त्यांनी ते वक्तव्य भावनेच्या भरात केल्याचे दिसते आहे, याबाबत पक्षप्रमुखच निर्णय घेतील, असेही राऊत म्हणाले. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले शिवसेनेचे माजी खा.खैरे यांचा १२ मार्च रोजी वक्तव्य करताना तोल गेला. पक्षाकडून माझ्या नावाचा विचार राज्यसभा सदस्यत्वासाठी होईल. परंतु ऐनवेळी काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव पुढे आल्यामुळे मन उद्विग्न झाले आहे. निष्ठावंताला न्याय मिळेल असे वाटले होते. परंतु पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. चतुर्वेदी काँग्रेसमध्ये होत्या. त्या पूर्वी गुरुदास कामत यांच्या समर्थक होत्या. त्यानंतर खा.राहुल गांधी यांच्याकडे गेल्या. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचे फळ त्यांना मिळाले, असे खैरे म्हणाले होते. त्यानंतर १५ मार्च रोजी त्यांनी राऊत यांची भेट घेऊन सगळा घडलेला प्रकार व्यथित होऊन मांडला. खैरे आणि राऊत यांच्या भेटीत नेमके काय झाले, याबाबत राऊत यांची भेट घेऊन जाणून घेण्याचा ‘लोकमत’ने प्रयत्न केला.
नवीन पिढीचे व्हिजन वेगळे आहे
खा. राऊत म्हणाले, खैरे आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी रविवारी माझी भेट धेतली. परंतु उमेदवारीबाबत पक्षाचा निर्णय झालेला असतो. त्या निर्णयानुसार प्रियंका चतुर्वेदी नवीन असल्या तरी त्यांना उमेदवारी दिली गेली. भविष्यातील पक्षाच्या काही धोरणासाठी त्यांचा फायदा होणार असेल म्हणूनच त्यांना संधी दिली असेल. आमची जी नवीन पिढी राजकारणात आहे. ती काही तरी वेगळा विचार करीत आहे. नवीन लोकांना पक्षात आणल्यावर त्यांना जबाबदारी देणे गरजेचे आहे. नवीन लोकांना संधी दिली नाही तर त्यांनी पक्षात का यावे? राजकारणात कुणी साधू-संत नसतात. काही तरी इच्छा म्हणूनच लोक पक्षांतर करीत असतात.