श्रमदानातून खोदली आदिवासींनी विहीर

By Admin | Published: May 30, 2016 12:54 AM2016-05-30T00:54:26+5:302016-05-30T01:13:39+5:30

सुरेश चव्हाण , कन्नड दरवर्षीच भेडसावणारी पाणीटंचाई व त्यावर टँकरचा तात्पुरता उपाय. ही कुचंबणा थांबविण्यासाठी ठाकरवाडीचे आदिवासी एकत्र आले व त्यांनी कामगार दिनास

Khodli khodli tribals have a well of excavation | श्रमदानातून खोदली आदिवासींनी विहीर

श्रमदानातून खोदली आदिवासींनी विहीर

googlenewsNext


सुरेश चव्हाण , कन्नड
दरवर्षीच भेडसावणारी पाणीटंचाई व त्यावर टँकरचा तात्पुरता उपाय. ही कुचंबणा थांबविण्यासाठी ठाकरवाडीचे आदिवासी एकत्र आले व त्यांनी कामगार दिनास श्रमदानातून विहीर खोदण्यास सुरुवात केली. १५ दिवसांच्या आत विहीर खोदून पूर्ण झाली अन् केवळ ३० फुटांवर पाणी लागल्याने ठाकरवाडीला आनंदाचे भरते आले.
निमडोंगरी गु्रप ग्रामपंचायतअंतर्गत ठाकरवाडी आहे. वाडीत अख्खा ठाकर समाज, वाडीची लोकसंख्या जेमतेम ४००. बहुतेक सर्वजण ऊसतोड कामगार, उरलेल्या काळात थोडीफार असलेली शेती कसणे आणि मोलमजुरी हा यांचा व्यवसाय. वाडीत जाण्यासाठी असलेला कच्चा जोडरस्ता. वाडीला दरवर्षी पाण्याची टंचाई, प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात टँकर. ही समस्या कायमची दूर करण्याचे वाडीने ठरविले. वाडीपासून २ कि.मी.अंतरावर सरकारी इनाम (जमीन) आहे. या जमिनीपासून नाला आहे. या नाल्याच्या काठावर श्रमदानातून विहीर खोदण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले. महाराष्ट्रदिनी काम सुरू करण्यात आले. निमडोंगरीचे सरपंच सुरेश नीळ व माजी सभापती शेकनाथ चव्हाण यांनी प्रोत्साहन दिले.
ग्रामपंचायतने क्रे न उपलब्ध करून दिले. विहिरीवर श्रमदान करण्यासाठी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही सरसावल्या. विहिरीचे काम ३० फूट खोल झाले आणि विहिरीला पाणी लागले. सर्वांचा आनंद गगनात मावेना. या पाण्याचे पूजन उपविभागीय अधिकारी राजू नंदकर यांच्या हस्ते शाखा अभियंता कालिदास उपासनी, सरपंच सुरेश नीळ व ठाकरवाडी-निमडोंगरी येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी विहिरीपासून वाडीपर्यंत पाईपलाईन करून देण्याची मागणी केली. उपविभागीय अधिकारी राजू नंदकर यांनी ठाकरवाडीच्या रहिवाशांचे कौतुक करून विहिरीपासून गावापर्यंत तात्पुरत्या पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी तांत्रिक बाबी तपासण्यासाठी पाणीपुरवठा विभाग खुलताबाद यांना आदेशित केले.
‘आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं’ या ना.धों. महानोरांच्या गीताप्रमाणे जंगलात अथवा डोंगर टेकडीच्या पायथ्याशी वस्ती करून राहणारा अशिक्षित आदिवासी ठाकर समाज काळानुरूप बदलताना दिसत आहे. एकीच्या बळाची महती त्यांना कळली आहे आणि म्हणूनच शासनाच्या भरवशावर न बसता ठाकरवाडी एकत्र आली आणि ‘आपुले भविष्य आपुल्या हाती’ या उक्तीप्रमाणे झपाटून कामाला लागले आणि नवीन इतिहास घडविला.

Web Title: Khodli khodli tribals have a well of excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.