एका खोकड प्राण्याने विमान १५ मिनिट आकाशात फिरविले;विमानतळ प्रशासनाने नंतर हा घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 15:31 IST2022-03-04T15:26:57+5:302022-03-04T15:31:32+5:30
चिकलठाणा विमानतळावर दररोज दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास एअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद शहराच्या आकाशात दाखल झाले.

एका खोकड प्राण्याने विमान १५ मिनिट आकाशात फिरविले;विमानतळ प्रशासनाने नंतर हा घेतला निर्णय
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर मोकाट कुत्रे आल्याने विमानाच्या उड्डाणात आणि उतरण्यात अडथळा निर्माण झाल्याच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, धावपट्टी परिसरात गुरुवारी एक खोकड प्राणी आढळून आला. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईहून दाखल झालेल्या एअर इंडियाच्या विमानास धावपट्टीवर उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे जवळपास १५ मिनिटे विमान हवेत घिरट्या मारत होते.
चिकलठाणा विमानतळावर दररोज दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास एअर इंडियाचे मुंबई-औरंगाबाद शहराच्या आकाशात दाखल झाले. परंतु धावपट्टी परिसरात खोकड आढळून आले. त्यामुळे विमानतळावरून विमानाच्या लँडिंगला परवानगी नाकारण्यात आली. धावपट्टी परिसरात दिसलेला हा प्राणी आधी कोल्हा असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु ते खोकड असल्याचे स्पष्ट झाले.
वन्यजीव कायदा लक्षात घेऊन कोणतीही हानी न पोहोचविता खोकड निघून जाण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तोपर्यंत विमान आकाशात घिरट्या मारत होते. शहराभोवती विमानाने दोन ते तीन घिरट्या मारल्यानंतर लँडिंगसाठी सुरक्षित स्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर विमान उतरले, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.