तब्बल १५ वर्षांनी झाले खुलताबाद बसस्थानक टकाटक; आता सुरु होण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 05:16 PM2018-05-16T17:16:34+5:302018-05-16T17:17:25+5:30
बसस्थानकाचे बांधकाम तसेच दुरूस्तीचे काम २० दिवसांपूर्वीच पूर्ण झाले असून आता हे बसस्थानक लवकर सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
खुलताबाद (औरंगाबाद ) : गेल्या पंधरावर्षापासून बेवारस, बंद व पडझड झालेल्या अवस्थेत असलेल्या खुलताबादच्या एस.टी. बसस्थानकाचे रुपडं आता पालटल आहे. बसस्थानकाचे बांधकाम तसेच दुरूस्तीचे काम २० दिवसांपूर्वीच पूर्ण झाले असून आता हे बसस्थानक लवकर सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
खुलताबाद शहर हे धार्मिक व पर्यटनस्थळ असून या ठिकाणी असलेले एस.टी. महामंडळाचे बसस्थानक 15 वर्षापासून बंद असल्याने या बसस्थानकाची मोठी तोडफोड झाली होती. तसेच एस.टी.महामंडळाच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याबाबत "लोकमत "ने वेळोवेळी वृत्त प्रसिध्द करून एस.टी.महामंडळाला जागे करण्याचे काम केले. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी बसस्थानक सुरू करण्याबात पाठपुरावा केला असल्याने सदरील बसस्थानक दुरूस्ती व बांधकाम करण्यासाठी एस.टी.महामंडळाने ७ लाख रूपये मजूंर करून सुसज्ज असे बसस्थानकाचे काम पुर्ण केले. परंतु, काम पूर्ण होऊन जवऴपास 20 दिवस होत आले तरी बसस्थानक सुरू करण्याबाबत एस.टी.महामंडळाच्या कुठल्याच हालचाली दिसत नाहीत. प्रवास्यांची गैरसोय टाळण्यासाठी बसस्थानक लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
वेरूळ, दौलताबादला तर बसस्थानकच नाही
जगप्रसिध्द वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग श्री. घृष्णेश्वर मंदीर, दौलताबाद या ठिकाणी दररोज देशी-विदेशी पर्यटक, भाविक मोठ्याप्रमाणावर येतात. मात्र या ठिकाणी बसस्थानक नसल्याने पर्यटक व भाविकांना रस्त्यावरच उभे राहून बसेसची वाट पाहावी लागते.