खुलजा सिम सिम...
By Admin | Published: October 19, 2014 12:18 AM2014-10-19T00:18:23+5:302014-10-19T00:21:52+5:30
आशपाक पठाण , लातूर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गेल्या महिनाभरापासून रात्रीचा दिवस करून मतदारांच्या दारोदारी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची कसोटी पणाला लागली आहे.
आशपाक पठाण , लातूर
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत गेल्या महिनाभरापासून रात्रीचा दिवस करून मतदारांच्या दारोदारी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची कसोटी पणाला लागली आहे. १५ आॅक्टोबर रोजी मतदान झाल्यावर कार्यकर्त्यांनी विजयाची गणिते जुळवीत आपणच कसे सरस राहू, याविषयी चर्चेचे गुऱ्हाळ गाळले. लातूर शहरातील अनेक कट्ट्यांवर मध्यरात्रीपर्यंतही निकालावर ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह युवकांनीही चर्चा घडवून आणल्या. नेत्यांना दिलेला शब्द पूर्णत्वास जातो की नाही, मतदारांनी आपल्याला तारले की मारले, हे रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत उघडकीस येणार असल्याने कार्यकर्त्यांच्या मनात धाकधुक् सुरू आहे. तर मतदार ‘खुलजा सिम सिम...’ ची वाट पाहत आहेत़
लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ असलेल्या लातूर शहर व औसा विधानसभा मतदारसंघात काय होणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. तिरंगी व चौरंगी लढतीचा फायदा आपणालाच होईल, असा आत्मविश्वास सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये आहे. शिवाय, कार्यकर्त्यांनीही नेत्यांना व उमेदवारांना विजय आपलाच होईल, अशी खात्री दिल्याने सर्वचजण निकालाकडे डोळे लावून आहेत. शिवाय, उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्याच उमेदवाराचा विजय होईल, यावर पैजाही लावल्या आहेत. लातूर शहरात गेल्या तीन दिवसांपासून गल्लीबोळातही निवडणुकीची चर्चा रंगली आहे.
राजकीय पक्षांचे उमेदवारही कार्यकर्त्यांकडून मतदानाची आकडेवारी घेऊन प्लस-मायनसचा गेल्या तीन दिवसांपासून मेळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. कुठल्या बूथवर किती मते मिळाली असतील, याचा अंदाज काढण्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या विश्वासावर उमेदवारही आपणच विजयी होणार असल्याच्या आनंदात आहेत.
औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर या चारही मतदारसंघांतील लढतींकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे लातूर शहर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. लातूर शहर मतदारसंघात गेल्या तीन दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते विजय आपलाच असल्याचे सांगत सुटले आहेत. त्यामुळे दुपारनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होणार असले, तरी कार्यकर्त्यांना मात्र चांगलीच धास्ती लागली आहे. नेत्यांना दिलेला शब्द खरा ठरतो की चुकीचा, यावर कार्यकर्ते चिंतन करीत आहेत. दिवाळीच्या अगोदर कोणाच्या फटाक्यांचा आवाज वाढणार आणि तो आवाज कुठवर जाणार, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे़ रविवारी दुपारनंतर दिवाळीपुर्वीच फटाके फुटणार आहेत़
राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पैजा लावण्यातच दंग आहेत. कार्र्यकर्त्यांचे दुकान भले कुठलेही असो, चर्चा मात्र ग्राहकांसोबत राजकारणावरच व कोण विजयी होईल, यावरच केल्या जात आहेत. सर्वसामान्य मतदार मात्र कोणीही आलं तरी आपलंच... अशी भावना व्यक्त करीत आहेत. कुठे पंजाची, कुठे कमळाची, कुठे घड्याळाची, कुठे धनुष्यबाणाची, कुठे इंजीनची तर कुठे शिट्टीचा आवाज रंगला आहे. रविवारी दुपारी १२ नंतर दिवाळीपूर्वीच फटाके कोण वाजविणार, कोणाचा आवाज वाढणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
उमेदवार व पक्षाचे नेते विजयाची गणिते जुळवीत आहेत. तर कार्यकर्ते बूथनिहाय कोण किती मतांनी प्लस राहील, कोण मायनस राहील, याचा विचार करीत आहेत. गल्लीतील कट्ट्यांवर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर प्लस-मायनसचे दावे करीत आहेत. हा समाज आमच्याकडे, ही गल्ली आमच्याकडे, तो गट आमच्याकडे, ते व्यापारी आमच्याकडे असे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कोणाच्या पारड्यात मतदार राजाने किती वजन टाकले, हे मात्र दुपारपर्यंत सिद्ध होणार आहे. त्यामुळे विजयाचा कांगावा करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची बोलती मतमोजणीला सुरुवात झाल्यावर दोन ते तीन तासांतच बंद होणार आहे. ‘खुलजा सिम सिम...’ म्हणत मतदार मात्र प्रशासनाच्या मतमोजणीकडे लक्ष देऊन बसला आहे. मोबाईल, टीव्ही व अन्य साधणे मतमोजणीच्या पहिल्या दिवशीच उत्सुक कार्यकर्ते व मतदारांनी अपडेट् करून ठेवल्या आहेत.