खुलताबाद पंचायतसमिती कार्यालयात आग; समाजकल्याण विभागाचे सर्व रेकॉर्ड भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 15:09 IST2024-04-06T13:38:15+5:302024-04-06T15:09:05+5:30
आज सकाळी उघडकीस आली आगीची घटना

खुलताबाद पंचायतसमिती कार्यालयात आग; समाजकल्याण विभागाचे सर्व रेकॉर्ड भस्मसात
खुलताबाद: खुलताबाद पंचायतसमिती कार्यालयास शुक्रवारी रात्री आग लागली. यात समाजकल्याण विभागाचे सर्व रेकॉर्ड, अभिलेखे, जुन्या फाईली व प्रस्ताव आदीसह इतर कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. ही घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
खुलताबाद पंचायत कार्यालयाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण होऊन दहा महिने झाले आहेत. मात्र, केवळ फर्निचरचे काम होत नसल्याने पंचायत समितीचे कामकाज सध्या शिक्षण विभागाच्या छोट्या जागेत सुरू आहे. ही इमारतही मोडकळीस आली आहे. त्यामुळे खिडक्या दरवाजे अर्धवट स्थितीत असतात. शुक्रवारी रात्री पंचायत समितीच्या कार्यालयात अचानक आग लागली. यात समाजकल्याण विभागाचे सर्व रेकॉर्ड, जुने प्रस्ताव, काही नवे, जुने अभिलेखे जळून खाक झाले.
दरम्यान, सकाळी ८ वाजता इमारतीतून धूर निघत असल्याचे काहींना दिसले त्यांनी सदरील माहिती गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांना दिली. गटविकास अधिकारी नाईक यांनी तात्काळ खुलताबाद येथे पोहचून कार्यालयाची पाहणी करत खुलताबाद पोलीसांना माहिती दिली. घटनास्थळी खुलताबाद पोलीसांनी पाहणी करून पंचनामा केला असून या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.