आंध्र प्रदेशातून ‘किया मोटर्स’चा काढता पाय; पुन्हा औरंगाबादेत येण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 01:17 PM2020-02-07T13:17:46+5:302020-02-07T13:22:38+5:30

हा प्रकल्प  सुरुवातीला औरंगाबादेतील ‘डीएमआयसी’ अंतर्गत ‘ऑरिक सिटी’मध्ये येणार होता.

Kia Motors hopes to return to Aurangabad from Andhra Pradesh | आंध्र प्रदेशातून ‘किया मोटर्स’चा काढता पाय; पुन्हा औरंगाबादेत येण्याची आशा

आंध्र प्रदेशातून ‘किया मोटर्स’चा काढता पाय; पुन्हा औरंगाबादेत येण्याची आशा

googlenewsNext
ठळक मुद्देकिया मोटार्स कॉर्पोरेशनने आंध्र प्रदेशात सात हजार कोटींची गुंतवणूक केली. आंध्र प्रदेश सरकारच्या धोरणांमुळे प्रकल्प तेथून तामिळनाडूमध्ये हलविण्याचा निर्णय

औरंगाबाद : आंध्र प्रदेश सरकारच्या धोरणांमुळे किया मोटर्स या कोरियन कार उद्योगाने आपला प्रकल्प तेथून तामिळनाडूमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हा प्रकल्प तामिळनाडूऐवजी महाराष्ट्रात आणि तोही औरंगाबादला डीएमआयसीमध्ये येण्यासंबंधी पुन्हा एकदा औरंगाबादकरांच्या आशा उंचावल्या आहेत. 

हा प्रकल्प  सुरुवातीला औरंगाबादेतील ‘डीएमआयसी’ अंतर्गत ‘ऑरिक सिटी’मध्ये येणार होता. मात्र, या उद्योगाच्या काही अटी व शर्ती पूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकारला अपयश आले. त्यामुळे २०१७ मध्ये या उद्योगाने औरंगाबादऐवजी आंध्र प्रदेशमध्ये आपले बस्तान मांडले. दरम्यान, यावेळी राज्य सरकारने प्रयत्न केल्यास किया मोटर्सचा प्रकल्प औरंगाबादेत येऊ शकतो, अशी अपेक्षा स्थानिक उद्योजकांनी व्यक्त केली आहे. 

किया मोटार्स कॉर्पोरेशनने आंध्र प्रदेशात सात हजार कोटींची गुंतवणूक केली. दोन- अडीच वर्षांतच तेथील सरकारच्या जाचक धोरणांमुळे या प्रकल्पाने आता तामिळनाडूमध्ये प्रकल्प स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प जर औरंगाबादेत आला, तर  तर येथील उद्योगविश्व आणि अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. लघु व मध्यम उद्योग वाढीसाठी मोठी मदत होईल. विदेशी गुंतवणूक वाढून डीएमआयसीमध्ये उद्योग येण्यास मदत होऊ  शकते. 

यासंदर्भात ‘सीआयआय’चे मुकुंद कुलकर्णी म्हणाले, हा प्रकल्प औरंगाबादेत ‘डीएमआयसी’मध्ये आणणे शक्य आहे. औरंगाबादेत आॅटोमोबाईल्स उद्योगांसाठी पूरक व पोषक वातावरण आहे. त्यासाठी ‘डीएमआयसी’ हे सर्वोत्तम पायाभूत सुविधा देणारे ठिकाण आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे किया मोटार्सला दळणवळणासाठी पूर्वेकडील बंदर हवे आहे. म्हणून कदाचित त्यांनी तामिळनाडूसाठी पसंती दिली असावी. असे असले तरी आपण दळणवळणासाठी प्रोत्साहन देऊन किया मोटार्सला औरंगाबादेत खेचून आणू शकतो. यासाठी शासनस्तरावर जोरदार प्रयत्न व्हायला पाहिजे.


आधीही ‘किया’सोबत झाली होती चर्चा : किया मोटर्स औरंगाबादला डीएमआयसीमध्ये येणार असल्याची २०१७ मध्ये चर्चा होती. यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोरियन कंपनीबरोबर दोन बैठकाही घेतल्या होत्या. एक शिष्टमंडळही कोरियाला जाऊन आले होते. कंपनीने महाराष्टÑात यावे, यासाठी राज्याचा उद्योग विभाग त्यावेळी पूर्ण प्रयत्नशील होता. मात्र त्यावेळी कंपनीने आपली गाडी आंध्र प्रदेशकडे वळविली. त्यामुळे डीएमआयसीमधील मोठ्या गुंतवणुकीला धक्का बसला होता. 

प्रकल्प आणण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू
याआधी औरंगाबादला डीएमआयसीमध्ये ‘किया’ मोटर्सचा प्रकल्प येण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र त्यावेळी यश आले नाही. आता ही कंपनी आंध्र प्रदेशातून स्थलांतरित होणार असेल आणि महाराष्ट्रात यायला इच्छुक असेल तर त्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू. तामिळनाडू ज्या सुविधा देणार आहे, त्याचाही अभ्यास करु आणि त्यापेक्षा अधिक सुविधा औरंगाबादला कशा देता येतील, यासाठी प्रयत्न करु. यासाठी आमचे अधिकारी कामाला लावले आहेत. औरंगाबादला कंपनीने यावे, यासाठी चर्चा करता येईल.
- सुभाष देसाई, उद्योगमंत्री  
 

Web Title: Kia Motors hopes to return to Aurangabad from Andhra Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.