पुण्यात अपहृत तरुणीने केली स्वत:च सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 05:14 PM2019-09-10T17:14:47+5:302019-09-10T17:14:58+5:30
या अपहरणकर्त्याच्या तावडीतून त्या तरुणीने स्वत:च सुटका करुन घेत पुण्यात पोलीस ठाणे गाठल्याने पुढील अनर्थ टळला.
वाळूज महानगर : कंपनीत कामासाठी जाणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचे रांजणगावातून चौघांनी अपहरण करुन पुण्यात डांबून ठेवले होते. या अपहरणकर्त्याच्या तावडीतून त्या तरुणीने स्वत:च सुटका करुन घेत पुण्यात पोलीस ठाणे गाठल्याने पुढील अनर्थ टळला.
रांजणगाव शेणपुंजी येथील वास्तव्यास असणारी शितल (नाव बदलले आहे) ही ७ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता कंपनीत जाण्यासाठी घराबाहेर पडली. गावातील रिक्षा स्टॅण्डवर एका रिक्षामध्ये मास्क लावलेले चार प्रवासी बसलेले होते. यावेळी या प्रवाशांना अगोदर पंढरपूरला सोडुन देऊ व त्यानंतर तुला कंपनीत सोडतो, असे सांगून तिला चालकाने रिक्षात बसवले.
काही वेळातच एकाने तिच्या तोंडावर हाताने काहीतरी मारल्यामुळे ती बेशुद्ध झाली. दुपारी १.३० वाजेच्या सुमारात ती शुद्धीवर आली. एका रुममध्ये असल्याचे तिला कळले. विशेष म्हणजे या रुममध्ये ते चौघेही होते. सचिन ताडेवाडच्या सांगण्यावरुन तुला पुण्याला आणल्याचे चौघांनी सांगितले. सचिनने यासाठी २० हजार रुपये दिल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तीनजण जेवणाचा डबा आण्यासाठी रुमबाहेर पडले. तर एकजण तेथेच होता. काही वेळाने तोही निघुन गेला. कुणीही नसल्याची संधी साधून तिने तिच्याजवळील मोबाईलवरुन मारुती जंगीलवाड या नातेवाईकाशी संपर्क साधला. परिसरातील कुणाची मदत घेण्याचा सल्ला दिला. यानंतर खिडकीतून तिला एक मुलगी दिसली.
तिला मदतीसाठी बोलावले. त्या मुलीने दरवाजा उघडल्यानंतर शितल रुममधून बाहेर पडली. तिने हाडपसर पोलीस ठाणे गाठत आपबीती सांगितली. हाडपसर पोलिसांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती दिली. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पुण्यातून रविवारी (दि.८) रात्री शितलला सोबत घेतले.