पोलिसांनी 'त्या' अपहृत मुलीला दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून आणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 09:12 PM2018-10-19T21:12:39+5:302018-10-20T12:58:33+5:30
अल्पवयीन मुलीला ओडिशामधील केंद्रपाडा जिल्ह्यातून सुखरूप परत आणण्यात वेदांतनगर पोलिसांना यश आले.
औरंगाबाद : पदमपुऱ्यातून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला ओडिशामधील केंद्रपाडा जिल्ह्यातून सुखरूप परत आणण्यात वेदांतनगर पोलिसांना यश आले. तिला पळवून नेणा-याला पोलिसांनी अटक केली असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मुलीला लपवून ठेवले होते, त्या गावातील गुन्हेगारी लोकांमुळे सहसा तेथे जाण्यास कोणीही धजावत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रेमानंद ऊर्फ पप्पू बाबुराम बेहरा (२१, रा. बडा, आंबिरा, पोस्ट, नौमुंज, जि. केंद्रपाडा, ओडिशा), असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीची बहीण पदमपुरा येथे राहत असून, मेव्हणा प्लंबर आहे. त्याच्याकडे राहत असताना त्याची नजर पदमपुरा येथील अल्पवयीन मुलीवर पडली. ८ आॅक्टोबर रोजी ती बँकेत जात असताना त्याने तिचे अपहरण केले. त्यानंतर तो तिला घेऊन थेट त्याच्या ओडिशा राज्यातील मूळ गावी गेला.
नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला. याप्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी वेदांतनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक अनिल आडे, सहायक निरीक्षक वनिता चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सतीश जाधव, बाळासाहेब ओवांडकर, राहुल कांबळे, महिला कर्मचारी कावेरी शर्मा यांनी सायबर क्राईम सेलच्या मदतीने आरोपीला पकडण्यासाठी ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील महाकालपारा पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या मदतीने त्याचे गाव गाठले; मात्र तो तेथून मुलीसह त्याच्या मामाच्या गावी गेल्याचे समजले.
घनदाट जंगल आणि हिंद महासागरालगत बडी गाव आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी बडी येथून आरोपीसह त्या मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर तेथून सुमारे १ हजार ९०० किलोमीटरचा प्रवास करीत औरंगाबादेत परत आणले.