उद्योगनगरीत ठेकेदाराचे अपहरण; मारहाण करून तिघांनी लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 14:32 IST2021-01-01T14:29:23+5:302021-01-01T14:32:02+5:30
Crime News Aurangabad दोघांनी ठेकेदारास लिंक रोड चौफुलीवरील उड्डाणपुलाजवळ नेऊन लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

उद्योगनगरीत ठेकेदाराचे अपहरण; मारहाण करून तिघांनी लुटले
वाळूज महानगर : कंत्राटी कामगार पुरविणाऱ्या ठेकेदाराचे आठवडाभरापूर्वी तिघांनी अपहरण करून त्यांना निर्जनस्थळी नेऊन मारहाण करीत लुटल्याची घटना नुकतीच उद्योगनगरीत उघडकीस आली. या लुटमारीत ठेकेदाराची दुचाकी, रोख १५ हजार व मोबाइल घेऊन गुंड पसार झाले.
भाऊसाहेब चंद्रकांत काळे (४०, रा. वाडीनांदर, ता. पैठण, ह.मु. रांजणगाव) हे उद्योगनगरीतील कारखान्यात कंत्राटी कामगार पुरवितात. १९ डिसेंबरला सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दत्तनगर फाट्यावर मद्य प्राशन करून ते दुचाकीवरून (एमएच-२०, एफसी-५९१८) रांजणगाव फाट्यावर गेले होते. तीन गुंडांनी त्यांची दुचाकी थांबवून आमच्या दुचाकीत पेट्रोल टाका असे सांगितले. दोघांनी काळे यांना बळजबरीने दुचाकीवर बसवले व ते बजाजनगरच्या दिशेने निघून गेले. त्यांचा एक साथीदार काळे यांच्या दुचाकीजवळ पहारा देण्यासाठी थांबला होता.
मारहाण करून १५ हजार व मोबाइल लांबविला
या दोघांनी काळे यांना लिंक रोड चौफुलीवरील उड्डाणपुलाजवळ नेऊन लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. काळे यांच्या खिशातील रोख १५ हजार रुपये व २ हजार रुपयांचा मोबाइल बळजबरीने काढून ते दुचाकीवरून फरार झाले. यानंतर ते पायी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकी आणण्यासाठी रांजणगाव फाट्यावर आले. तेथे तो आरोपी व दुचाकीही नव्हती. काळे यांनी गुरुवारी (दि.३१) तक्रार दिली. उपनिरीक्षक चेतन ओगले हे तपास करीत आहेत.