दोन लाख रुपयांसाठी माजलगावातून नातीचे अपहरण
By Admin | Published: July 2, 2017 12:32 AM2017-07-02T00:32:54+5:302017-07-02T00:34:41+5:30
माजलगाव : शहरातील दत्त कॉलनी भागातील असद काझी यांचे सासू-सासऱ्याने दोन लाख रुपयांसाठी शनिवारी दुपारी नातीचे अपहरण केल्याची घटना घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शहरातील दत्त कॉलनी भागातील असद काझी यांचे सासू-सासऱ्याने दोन लाख रुपयांसाठी शनिवारी दुपारी नातीचे अपहरण केल्याची घटना घडली. याप्रकरणी अपहृत मुलीच्या आईने तिच्या आई-वडिलांसह ५ जणांविरूध्द शहर ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
दत्तनगरमध्ये राहणाऱ्या असद व आशिया काझी हे दाम्पत्य लहान बाळास दुपारी ३ च्या दरम्यान दुखत असल्यामुळे रुग्णालयात घेवून गेले होते. घरी त्यांची लहान मुलगी मरीयम (७) खेळत होती.
दरम्यान, आशिया काझी यांचे परभणी येथील आई-वडिलांसह भाऊ, बहीण व तिचा पती घरी आले. त्यांनी खेळत असलेल्या मरीयमला रिक्षात बसवून पळ काढला. मुलीस पळून नेत असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी असद काझी यांना ही माहिती फोनद्वारे कळवली. ते तात्काळ घरी आले व त्यांनी माहिती घेऊन बसस्थानक गाठले. मात्र, त्यांना तेथे कोणीही आढळून आले नाही. त्यांनी तात्काळ त्यांचे सासू-सासऱ्यांना फोन करून तुम्ही मुलीस का पळविले असे विचारले. यावर २ लाख रुपये आणून दे व तुझ्या मुलीस घेऊन जा असे उत्तर मिळाले.
यानंतर काझी दाम्पत्याने यांनी तात्काळ शहर ठाणे गाठले. पोलिसांनी संबंधितांस फोन केला असता त्यांनी मुलगी आमच्यासोबत असल्याचे सांगितले. आशिया काझी यांनी तिचे वडील शेख नूर, आई हुसेनाबी, भाऊ शेख सिवंसदर, बहीन रुबीना व तिचा पती शेख मुन्वर यांच्याविरूध्द मुलीस पळविल्याची व खंडणी मागत असल्याची तक्रार शहर ठाण्यात दिली.
ठाण्यात अपहरणाची तक्रार आली असतानाही पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली नाही. तसेच मुलीच्या शोधासाठीही प्रयत्न केले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी काझी दाम्पत्य रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते.