पैशाच्या व्यवहारातून हॉटेलचालकाचे अपहरण; रात्रभर जागून पोलिसांनी बीडमधून केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 04:55 PM2020-10-15T16:55:02+5:302020-10-15T17:01:06+5:30
पोलिसांनी दोन अपहरणकर्त्यांना अटक केली.
औरंगाबाद : पैशाच्या व्यवहारातून अपहरण झालेल्या हॉटेलचालकाची सिटीचौक पोलिसांनी बीड येथून मोठ्या शिताफीने सुटका केली. पोलिसांनी दोन अपहरणकर्त्यांना अटक केली. सुरेश गिराम आणि राजाभाऊ सोळुंके (रा. बीड), अशी अटकेतील अपहरणकर्त्यांची नावे आहेत. त्यांच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
विकास वशिष्ठ फरताळे (२७, रा. शिवाजीनगर), असे सुटका झालेल्या हॉटेलचालकाचे नाव आहे. विकासने आरोपी गिरामकडून ३ लाख रुपये तेल कारखाना सुरू करण्यासाठी घेतले होते. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने विकासला रक्कम परत करता आली नव्हती. गिराम यांनी पैसे मागितल्यानंतर विकास त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. यामुळे गिराम, सोळुंके आणि अन्य तीन लोकांनी विकासचे मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून अपहरण केले होते. ही माहिती समजताच त्याच्या वडिलांनी सिटीचौक ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली होती.
तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, कर्मचारी अप्पासाहेब देशमुख, संजय नंद, शेख गफ्फार, देशराज मोरे आणि दत्ता बडे यांच्या पथकाने रात्रीच बीड गाठून आरोपींचा शोध सुरू केला.
पोलिसांनी आरोपींच्या निवासस्स्थानाभोवती सापळा रचला. प्रकारातील संशयित आरोपी बीड येथील त्याच्या घरीच होते. तर अन्य आरोपी बीड शहरात आले नव्हते. यामुळे पोलीस घराबाहेर नजर ठेवून होते. रात्रभर पोलीस या घरावर पाळत ठेऊन होते. बुधवारी पहाटे आरोपींनी विकासला घेऊन बीडमध्ये प्रवेश केला. तेव्हा केवळ सुरेश गिराम आणि राजाभाऊ सोळुंके आणि विकास जीपमध्ये होते. पोलिसांनी तत्काळत्यांच्या त्यांच्यावर झडप घेत अगोगर त्यांच्या तावडीतून विकासची सुटका केली. आरोपींना ताब्यात घेतले. विकाससह आरोपींना घेऊन पोलीस सकाळी शहरात परतले. आरोपींनी गुरूवारी न्यायालयात हजर केले जाईल.
रात्रभर विकासला घेऊन फिरले आरोपी
आरोपींनी औरंगाबादेतून विकासला उचलल्यानंतर ते जालना, मंठा, आष्टीमार्गे बुधवारी सकाळी बीड शहरात गेले. रात्री एका ढाब्यावर त्यांनी एकत्र जेवण केले, असे सूत्राने सांगितले.
सर्व सुरक्षा भेदून तो रॉकेल घेऊन दालनात शिरलाhttps://t.co/NYkinQgwBU
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 15, 2020