पैठणच्या अपहृत तरुणाची २५ दिवसांनानंतर पोलिसांनी केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 01:13 PM2018-05-02T13:13:53+5:302018-05-02T13:21:05+5:30
२५ दिवसांपूर्वी पैठण शहरातून अपहरण केलेल्या १९ वर्षीय तरुणाची पैठण पोलिसांनी भिवरी सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील एका बंद घराच्या लाकडी कपाटातून मोठ्या शिताफीने सुटका केली.
पैठण ( औरंगाबाद ) : २५ दिवसांपूर्वी पैठण शहरातून अपहरण केलेल्या १९ वर्षीय तरुणाची पैठण पोलिसांनी भिवरी सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील एका बंद घराच्या लाकडी कपाटातून मोठ्या शिताफीने सुटका केली. या तरुणाच्या वडिलाने आरोपीकडून वीटभट्टीच्या व्यवसायासाठी पाच लाख रुपये हात उसने घेतले होते. दरम्यान, वीटभट्टी व्यवसायात सध्या मंदीचे वातावरण असल्याने घेतलेले उसने पैसे परत करणे शक्य न झाल्याने ४ एप्रिल रोजी या तरुणाचे पैठण येथून अपहरण करण्यात आले होते. गेले २५ दिवस या तरुणास लाकडी कपाटात बंद करून मोठा छळ करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. पैठण पोलिसांनी याप्रकरणी तीन महिलांसह चार आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात केली आहे.
पैठण येथील वीटभट्टी व्यावसायिक अशोक उमाजी पराड (रा. नवीन कावसान) यांनी विलास गायकवाड (रा. भिवरी सासवड, जि. पुणे) यांच्याकडून वीटभट्टीच्या व्यवसायासाठी पाच लाख रुपये उसनवारीवर घेतले होते. हे पैसे टप्प्याटप्प्याने परत देणार, असे पराड यांनी गायकवाड याला लिहून दिले होते. यापैकी ६० हजार रुपये परतफेड करण्यात आले होते. उसनवारी घेतलेल्या पाच लाखांपैकी चार लाख चाळीस हजार रुपये पराड यांना वेळेवर परत करणे शक्य न झाल्याने गायकवाड यांनी पैठण गाठून पराड यांच्याकडे पैशाची मागणी केली व रक्कम परत मिळत नाही हे लक्षात येताच गायकवाडने अशोक पराड यांचा मुलगा विश्वनाथ पराड (१९) याचे ४ एप्रिल रोजी जीपगाडीत बळजबरीने कोंबून अपहरण केले होते.
याप्रकरणी अशोक उमाजी पराड यांनी ५ एप्रिल रोजी पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवरून पैठण पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी संशयित आरोपींना पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. के. वारे यांनी २५ एप्रिल रोजी अटक केली होती. यात आरोपी विलास गायकवाड, दिव्या विलास गायकवाड, प्रमिला विलास गायकवाड, संगीता राजेंद्र गायकवाड (सर्व रा. भिवरी, जि. पुणे) यांचा समावेश होता. मुख्य आरोपी प्रतीक विलास गायकवाड फरार झाला होता. या सर्व आरोपींची पोलीस कोठडी घेण्यात आली. पोनि. इमले यांनी हवालदार सिराज पठाण व पोलीस नाईक राजू बर्डे यांना २९ रोजी रात्री भिवरी येथे रवाना केले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या घरावर छापा टाकून कपाटात दडवून ठेवलेल्या विश्वनाथची सुटका करून त्यास सोमवारी पैठण येथे आणले. त्याला बघून आईने हंबरडा फोडला.
असा लावला पोलिसांनी तपास
मुलाच्या वडिलाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी आरोपीचे मोबाईल क्रमांक घेऊन त्यांचे लोकेशन तपासले तसेच कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) वरून संशयित आरोपी गुन्हा घडला त्यावेळेस त्याच ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सुदाम वारे, हवालदार सिराज पठाण, पोलीस नाईक राजू बर्डे यांनी आरोपीचे भिवरी सासवड येथील घर गाठून घरातील तीन महिलांसह एक जणास अटक केली. पोलीस कोठडीत इमले यांनी चारही आरोपींची वेगवेगळी चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीत मोठी तफावत आढळून आल्याने अपहरण केलेला मुलगा त्यांच्या घरातच असल्याची खात्री झाली. तातडीने हवालदार पठाण व बर्डे यांना मुलाच्या शोधासाठी रवाना केले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या घराची झडती घेत असताना एका कपाटात विश्वनाथ पोलिसांना आढळून आला व त्याची सुटका केली.
खूप छळ केला -विश्वनाथ पराड
पैठण येथील गोलनाका परिसरातून सफारी गाडीतून आलेल्या तीन महिला व दोघांनी माझ्या गळ्याला चाकू लावून गाडीत बसविले. आवाज केला तर मारून टाकू, अशी धमकी दिली. भिवरी येथील एका बंद खोलीत डांबून मला खूप मारहाण करण्यात आली. मला गुडघ्यावर चालावे लागत होते. दोन शस्त्रधारी पहारेदार होते. चार वेळा पोलीस झडतीसाठी आले तेव्हा मला कपाटात डांबून ठेवायचे. मी प्रचंड दहशतीत असल्याने आवाज करण्याची हिंमत झाली नाही. परंतु काल जेव्हा पोलीस आले तेव्हा आरोपींनी मला कपाटात टाकले. पोलीस घराची झडती घेत असताना मी हळूच दरवाजा उघडून बाहेर पाहिले तेव्हा मी हे पैठणचे पोलीस असल्याचे ओळखले. तोपर्यंत राजू बर्डे यांनी कपाट उघडून मला बाहेर काढले. मी त्यांना घट्ट मिठी मारली. त्यांनी माझी सुटका केली, अशी आपबिती विश्वनाथ पराड याने सांगितली.