सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी अपहरणाचा कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:04 AM2021-04-14T04:04:06+5:302021-04-14T04:04:06+5:30
:शौर्य याच्या अपहरणकर्त्यांची कबुली आरोपीला पोलीस कोठडी; शौर्यच्या अपहरणकर्त्यांची कबुली वाळूज महानगर : खासगी सावकाराचे सहा लाखांचे कर्ज व ...
:शौर्य याच्या अपहरणकर्त्यांची कबुली
आरोपीला पोलीस कोठडी; शौर्यच्या अपहरणकर्त्यांची कबुली
वाळूज महानगर : खासगी सावकाराचे सहा लाखांचे कर्ज व मित्राला विक्री केलेल्या फ्लॅटचे हप्ते भरण्यासाठी वडगावातील शौर्य हिरेमठ या चिमुकल्याचा अपहरणाचा कट रचल्याची कबुली अपहरणकर्ता संतोष सनान्से याने पोलिसांनी दिली. आरोपी संतोष सनान्से याला न्यायालयात हजर केले असता त्याला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वडगाव कोल्हाटी परिसरातील शौर्य सोमशेखर हिरेमठ (६) या चिमुकल्याचे २० लाखांच्या खंडणीसाठी संतोष सनान्से याने सोमवारी अपहरण केले होते. शौर्यला दुचाकीवर बसवून आरोपी संतोषने त्याचे अपहरण केले. त्याची आई पौर्णिमा यांच्या मोबाइलवर संपर्क साधून २० लाखांची खंडणी मागितली होती. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या तीन तासात छडा लावून आरोपीला जेरबंद करून शौर्यची सुटका केली होती.
तिघांकडून घेतले होते कर्ज
या अपहरण प्रकरणातील आरोपी संतोषची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्याने कांचनवाडीतील तीन सावकारांकडून सहा लाखांचे कर्ज घेतल्याचे सांगितले. याशिवाय वाळूज महानगरात १८ लाखांचा फ्लॅट खरेदी केला होता. मात्र व्यवसाय बंद पडल्याने तसेच खासगी सावकाराचा तगादा सुरू असल्याने संतोषने एका मित्राकडून दोन लाख रुपये घेऊन हा फ्लॅट त्याला घेतलेल्या किमतीत विक्री केला होता. सावकाराच्या कर्जातून सुटका करून घेण्यासाठी संतोषनेे शौर्यच्या अपहरणाचा कट रचला होता. शौर्यचे वडील किराणा दुकान चालवित असल्याने तसेच आई इंग्लिश शाळा चालवित असल्याने आपल्याला २० लाख सहज मिळतील, असे संतोषला वाटले व त्याने अपहरण केले. या कटात फक्त आपण एकटेच सहभागी असल्याचे संतोषने सांगितले आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक गौतम वावळे करीत आहेत.